फिफा शिष्टमंडळाची गोवा केंद्राला भेट! पुढील वर्षी होणार १७ वर्षांखालील विश्वचषक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 08:28 AM2019-05-25T08:28:49+5:302019-05-25T08:29:39+5:30
२०१७ मध्ये फातोर्डा स्टेडिमवर फिफा १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धांचे सामने झाले होते.
मडगाव : भारतात पुढील वर्षी होणा-या फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी देशातील पाच केंद्राची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या केंद्रांत गोव्याचाही समावेश आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी फिफा शिष्टमंडळाने गुरुवारी केली. त्यांनी स्टेडियमच्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. केवळ ग्राऊंड पिच संदर्भात सुधारणा करण्यासाठी फिफा शिष्टमंडळाचे प्रमुख ओली यांनी भेटीदरम्यान सूचित केले आहे.
फिफा शिष्टमंडळासोेबत गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, सागचे अभियंते अनील रेंगणे, फातोर्डा स्टेडियमचे सह व्यवस्थापक महेश रिवणकर, फातोर्डा स्टेडियमचे मुख्य अभियंते दीपक लोटलीकर उपस्थित होते. त्यांनी फिफा दर्जानुसार ग्राऊंड आऊटफिल्डचा थर वाढविण्याची गरज असल्याचे तसेच प्लेयर्स रूम, रेफ्री रूम्स यांच्यात किंचीत बदल करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, २०१७ मध्ये फातोर्डा स्टेडिमवर फिफा १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धांचे सामने झाले होते. त्यावेळी या स्टेडिमवर फिफा संघटनेच्या मागणीनुसार बदल करण्यात आले होते. त्याप्रमाणे २०२० मध्ये होणा-या फिफा विश्वचषक महिला १७ वर्षांखालील स्पर्धेसाठी कोणतेही जास्त बदल करण्याची आवशक्यता भासणार नसल्याचे स्टेडियमच्या अधिका-यांनी सांगितले. या शिष्टमंडळाने सरावासाठी राखीव असलेल्या बाणावली व ऊतोर्डा येथील मैदानांही यावेळेस भेट दिली.
- फिफा १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर फिफाने भारतात दुस-यांदा महिला १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी पावले उचलली आहेत. स्पर्धा केंद्रांच्या पहिल्या टप्प्यातील भेटीत या शिष्टमंडळाने कोलकाता आणि गोवाच्या फातोर्डा स्टेडियमला अधिक पसंती दिलेली आहे.