FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत ‘फिफा’ फिव्हर, देश-विदेशातील क्रीडा रसिकांची विश्वचषकासाठी उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:00 AM2017-10-07T02:00:12+5:302017-10-07T03:29:08+5:30
१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त नवी मुंबईही ‘फिफा’मय झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममधील पहिली मॅच पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती
नवी मुंबई : १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त नवी मुंबईही ‘फिफा’मय झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममधील पहिली मॅच पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती. स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रसिकांना बॅग व इतर साहित्य मैदानामध्ये घेऊन जाण्यावरही निर्बंध घातले होते.
नवी मुंबईमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबॉल मॅच होणार असल्याने क्रीडा रसिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. न्यूझिलंड व तुर्की यांच्यामध्ये ५ वाजता पहिला सामना होणार असल्याने दुपारी २ नंतर पे्रक्षकांनी स्टेडिअम परिसरामध्ये येण्यास सुरुवात केली. ३ वाजल्यापासून प्रत्यक्ष स्टेडिअममध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली. क्रीडा रसिकांचा गोंधळ होऊ नये व अपघात टाळण्यासाठी स्टेडिअमसमोर पत्र्याचे कुंपण घालण्यात आले होते. प्रेक्षकांची कसून तपासणी करूनच आतमध्ये पाठविण्यात येत होते.
शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट विक्री
सामने सुरू होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट विक्री सुरू होती. फुटबॉलची क्रेझ पाहता आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी याठिकाणी सामन्यांना सुरुवात झाली असूनही तिक ीट विक्री मात्र सुरूच होती. याठिकाणी असलेल्या तिकीट विक्री केंद्रावरही पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता.
राज्याच्या कानाकोपºयातून फुटबॉलप्रेमी
पुणे, नाशिक, औरंगाबाद, रायगड, नागपूर आदी राज्यांतूनही फुटबॉलप्रेमींनी या ठिकाणी हजेरी लावली होती. आंतरराष्ट्रीय सामने पहिल्यांदाच भारतात होत असल्याने, यातून फुटबॉल खेळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी प्रचंड गर्दी करण्यात आली होती. दुपारपासूनच प्रवेशद्वारावर परगावाहून आलेल्या फुटबॉलप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली.
स्वच्छतेवर विशेष भर
स्वच्छ शहरांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या नवी मुंबईत फुटबॉलच्या सामन्यांकरिता जगभरातून फुटबॉलप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर देत शहराच्या सौंदर्यात बाधा येणार नाही याची पुरेपूर दखल घेतली. संपूर्ण स्टेडिअम परिसरात ओल्या आणि सुक्या कचºयासाठी स्वतंत्र कचरापेट्या ठेवण्यात आल्या होत्या. या संपूर्ण परिसरात प्लास्टीकच्या वापरावर बंदी ठेवण्यात आली होती.
चोख सुरक्षा
स्डेडिअमच्या सर्वच बाजूंनी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. मुख्य मार्ग वगळता इतर मार्गांवर बॅरिगेट्स लावून वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्याशिवाय पार्किंगला बंदी असतानाही रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा होण्याची शक्यता होती. रस्त्यावर उभी असलेली अशी वाहने वाहतूक पोलिसांमार्फत टोविंग व्हॅनद्वारे तत्काळ उचलली जात होती. यामुळे स्टेडिअमभोवती कुठेही वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
जगभरात फुटबॉल खेळाचे फॅड वाढत चालले असून, याठिकाणी सामने पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांना सामन्यांविषयी असलेली माहिती तसेच खेळणाºया संघांविषयी देखील पुरेशी माहिती होती. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या आवडत्या खेळाडंूना पाहण्यासाठीची उत्सुकता चेहºयावर पाहायला मिळाली. स्टेडिअमच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या शिक्षकांमध्ये आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याचे विशेष आकर्षण पाहायला मिळाले. याठिकाणी एनएमएमटी बसेसच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण केली जात होती.
विद्यार्थ्यांची गैरसोय
सुरक्षेच्या कारणावरून घातक वस्तू व पदार्थांसह बॅग, खाद्यपदार्थ, पाणी स्टेडिअममध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. याची पूर्वकल्पना शाळांना नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मात्र काहीशी गैरसोय झाली. बहुतांश विद्यार्थ्यांनी सोबत खाद्यपदार्थ आणले होते. शिवाय, शाळेकडूनही त्यांना बिस्कीट व पाण्याची बॉटल देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना खाऊ स्टेडिअमबाहेरच फस्त करावा लागला.