FIFA Football World Cup 2018 : 25 सामन्यांत 16 कर्णधार; या प्रशिक्षकाचा अजब फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 11:20 PM2018-07-05T23:20:39+5:302018-07-05T23:21:06+5:30
रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीचा थरार संपला असून आत्तापर्यंत अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. मात्र ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे यांनी केलेला विक्रम हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मॉस्को - रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीचा थरार संपला असून आत्तापर्यंत अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. मात्र ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे यांनी केलेला विक्रम हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ब्राझील संघाला पुन्हा जेतेपद मिळवून देण्यासाठी टिटे संघात सर्व प्रयोग करून पाहात आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरी ते मुख्य स्पर्धेपर्यंत अशा एकूण 25 सामन्यांत टिटे यांनी 16 कर्णधार बदलले. त्यांची ही कर्णधारांची रोटेशन पॉलिसी भलतीच हिट ठरत आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरूद्ध टिटे यांनी मिरांडाच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी टाकण्याची शक्यता आहे.
टिटे यांनी जून 2016 मध्ये प्रशिक्षकपदाचा कार्यभार हाती घेतला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी 25 सामन्यांत 16 कर्णधार बदलले. मेक्सिकोविरूद्धच्या बाद फेरीच्या लढतीत थिएगो सिल्वाच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने 2-0 असा विजय मिळवला होता. त्यांच्या या रोटेशन पॉलीसीवर प्रचंड टीका होत असली तरी ब्राझिलने विश्वचषक पात्रता स्पर्धेत 18 पैकी 12 सामने जिंकले, तर केवळ एका लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 5 सामने बरोबरीत सुटले. मुख्य स्पर्धेत 4 सामन्यांत 3 विजय आणि 1 बरोबरीचा निकाल लावण्यात त्यांनी यश मिळवले आहेत.
मार्सेलोच्या दुखापतीमुळे शुक्रवारच्या लढतीत त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय टिटे घेणार नाहित. अशा परिस्थितीत फिलीप लुईस हा एकमेव खेळाडू राहतो की ज्याने टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्णधारपद भुषवलेले नाही. मात्र टिटे बेल्जियमविरूद्ध मिरांडाला संधी देऊ शकतात.
टिटेंच्या मार्गदर्शनाखाली कोणी, कितीवेळा कर्णधारपद भुषविले ?
5 मिरांडा (बेल्जियमविरूद्धच्या लढतीचा समावेश )
4 डॅनी अॅलव्हेस*
3 थिएगो सिल्वा
2 मार्सेलो
1 रेनाटो ऑगस्टो, फिलीप लुईस, फर्नांडीनो, रॉबीनो*, नेयमार, फिलीप कुटिनो, पॉलिनो, कॅसेमिरो, मार्किनोस, विलियन, अॅलिसन, गॅब्रीयल जीजस
( * विश्वचषक संघात समावेश नसलेले )