FIFA Football World Cup 2018 : 25 दिवसांत त्यांनी प्रशिक्षकपद सोडले; कोण आहेत माजी विजेत्यांचे नवे गुरू ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 10:23 PM2018-07-09T22:23:57+5:302018-07-09T22:24:39+5:30
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेपूर्वी सुरू झालेले प्रशिक्षकपदाच्या गच्छंतीचे सत्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कायम राहिल्याने स्पेन संघ सध्या चर्चेत आहे.
मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेपूर्वी सुरू झालेले प्रशिक्षकपदाच्या गच्छंतीचे सत्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कायम राहिल्याने स्पेन संघ सध्या चर्चेत आहे. स्पेनच्या मावळत्या प्रशिक्षकांचा कार्यकाळ हा अवघ्या 25 दिवसांचा असल्याने सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
विश्वचषक स्पर्धेत स्पेनचे आव्हान बाद फेरीत यजमान रशियाने संपुष्टात आणले. पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या लढतीत रशियाने 4-3 (1-1) अशी बाजी मारली. त्यामुळे 2010च्या विश्वविजेत्या स्पेनला गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर प्रशिक्षक फर्नांडो हिएरो यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी प्रशिक्षक ज्युलेन लोपेटेगुई यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनी फेडरेशनला कोणतिही कल्पना न देता रेयाल माद्रिद क्लबचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
#RUS live on!
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 1, 2018
The Luzhniki has exploded into a sea of celebrations. The hosts are into the quarter-finals!#ESPRUSpic.twitter.com/tXt1IvxVdN
हिएरो यांच्या जागी बार्सिलोना क्लबचे माजी प्रशिक्षक ल्युईस एनरीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 48 वर्षीय एनरीक यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोनाने 9 जेतेपद पटकावली आहेत. स्पेनचे माजी खेळाडू असलेल्या एनरीक यांनी 62 सामन्यांत 12 गोल्स केले आहेत. तसेच ते 1992च्या ऑलिम्पिक विजेत्या स्पेनच्या संघातील सदस्य होते. त्याशिवाय त्यांनी विश्वचषक आणि युरो स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
🚨 OFICIAL | @LUISENRIQUE21, nuevo seleccionador de la @SeFutbol#BienvenidoLuisEnriquepic.twitter.com/DuPcxVPyDI
— Selección Española de Fútbol (@SeFutbol) July 9, 2018