FIFA Football World Cup 2018 : रोनाल्डोला रोखण्याचे उरुग्वेचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 01:32 AM2018-06-30T01:32:16+5:302018-06-30T01:32:31+5:30
रोनाल्डो सुपरस्टार असला तरी अन्य खेळाडूंसारखा आम्ही त्याच्यावरही वचक ठेवू. पण एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करून डावपेच आखले जात नाहीत, असे उरुग्वेचे मत आहे.
सोची : पोर्तुगालविरुद्ध होणाऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत प्रतिस्पर्धी स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याला रोखण्याचे लक्ष्य उरुग्वेचा कर्णधार दिएगो गॉडिन याने आखले आहे.
उरुग्वे संघ रियाल माद्रिदचा स्टार रोनाल्डोला टार्गेट करणार असून दुसरीकडे ३३ वर्षांचा रोनाल्डो हा देखील शानदार फॉर्ममध्ये आहे. पण उरुग्वे या स्पर्धेत एकमेव असा संघ आहे, ज्याने एकही गोल होऊ न देता बाद फेरीत प्रवेश निश्चित केला. एटलेटिको संघाकडून खेळणाऱ्या गॉडिनचा बचाव युरोपियन क्लब संघात सर्वांत चांगला आहे. २०१८ मध्ये उरुग्वेने सहा सामन्यात आपल्याविरुद्ध एकही गोल होऊ दिला नाही, हे विशेष. रोनाल्डो सुपरस्टार असला तरी अन्य खेळाडूंसारखा आम्ही त्याच्यावरही वचक ठेवू. पण एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करून डावपेच आखले जात नाहीत, असे उरुग्वेचे मत आहे.
स्पेनविरुद्ध केलेल्या हॅट्ट्रिकसह रोनाल्डोने स्पर्धेत चार गोल नोंदविले. युरोपियन खेळाडूंमध्ये त्याचे सर्वाधिक ८५ गोल आहेत. गॉडिनच्या एटलेटिकोविरुद्ध त्याने दोन वर्षांत दोनदा हॅट्ट्रिक केली असून चॅम्पियन्सचे दोनदा जेतेपद मिळवून दिले.
प्रतिस्पर्धी उरुग्वे संघ शानदार आहे. संघात गॉडिनसह रॉड्रिगो बेंटानकुर, लुकास टोरेरा आणि माटियास वेसिनोसारखे मिडफिल्डर आहेत. याशिवाय लुई सुआरेज आणि एडिन्सन कावानी हे गोल नोंदविणारे खेळाडू आहेत. सुआरेज आधीसारखा चपळ नसला तरी रशियात त्याने दोन गोल नोंदविले. पोर्तुगालचे कोच फर्नांडो सँटोस यांना देखील रोनाल्डोसह युवा खेळाडू बर्नार्डो सिल्वा आणि गोंकालो गुएडेस यांच्याकडून बऱ्याच आशा आहेत.
फ्रान्सने साखळीत तीनपैकी दोन सामने जिंकले तर एक सामना ड्रॉ झाला. अर्जेंटिनाला केवळ एक विजय नोंदविता आला. एक सामना गमविण्याची त्यांच्यावर नामुष्की आली तर एक सामना ड्रॉ झाला. वाढत्या वयाचे खेळाडू आणि संतुलितपणाचा अभाव यामुुळे अर्जेंटिना त्रस्त आहे. क्रोएशियाविरुद्धच्या लढतीत या उणिवा चव्हाट्यावर आल्या होत्या. पण नायजेरियाविरुद्ध मेस्सीने नोंदविलेला गोल हे शुभसंकेत असल्याचे संघ व्यवस्थापनाला वाटते.
दुसरीकडे फ्रान्स अपराजित आहे, पण सुस्त वाटतो. स्ट्रायकर एंटोजेन ग्रीजमन आतापर्यंत सर्वोत्कृष्ट खेळ करू शकला नाही. मधली फळी देखील अनेकदा विखुरलेली आढळली. तथापि, सामन्याआधी माझा संघ लय मिळविण्यात यशस्वी ठरेल, असा दावा फ्रान्सचे कोच डिडियर डिशचॅम्प यांनी केला.