Fifa Football World Cup 2018: रोनाल्डोची 'किक' अडवणारा अलीरेझा कधीकाळी गाड्या धुवायचा, रस्ते झाडायचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 07:00 IST2018-06-26T03:25:33+5:302018-06-26T07:00:00+5:30
कर्ज काढून तो तेहरानला आला. रस्त्यावर झोपला. पैसे कमवण्यासाठी त्याने रस्त्यावर झाडूही मारली, गाड्या धुतल्या आणि त्याच रस्त्यावर राहणाऱ्या इराणच्या अलीरेझा बेइरानवांडने पोर्तुगालच्या रोनाल्डोचा गोल अडवला अन् विश्वचषकात तो हिरो ठरला.

Fifa Football World Cup 2018: रोनाल्डोची 'किक' अडवणारा अलीरेझा कधीकाळी गाड्या धुवायचा, रस्ते झाडायचा!
मॉर्डोविया एरिना : निर्वासित कुटुंबात त्याचा जन्म झाला... विंचवासारखं बिऱ्हाड. आज इथे तर पुढच्या महिन्यात कुठे असू याचा पत्ता नाही. पण त्याला फुटबॉलचं वेड होतं. घरच्यांचा मात्र विरोध. तो गोलकिपींग करायचा. पण त्याच्या वडिलांनी त्याचे ग्लोव्ह्ज फाडून टाकले. हे कळल्यावर त्यानं घर सोडलं. कर्ज काढून तो तेहरानला आला. रस्त्यावर झोपला. पैसे कमवण्यासाठी त्याने रस्त्यावर झाडूही मारली, गाड्या धुतल्या आणि त्याच रस्त्यावर राहणाऱ्या इराणच्या अलीरेझा बेइरानवांडने पोर्तुगालच्या रोनाल्डोचा गोल अडवला अन् फुटबॉल विश्वचषकात तो हिरो ठरला.
इराणने पोर्तुगालबरोबरच्या सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली, पण त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. सामन्याच्या 53व्या मिनिटाला रोनाल्डोला स्पॉट किक मारण्याची संधी देण्यात आली. रोनाल्डोचा स्पॉट किक अवडवण्याची छाती कुणाची होईल, पण अलीरेझाने धैर्याने सामना केला. रोनाल्डोचा गोल त्याने अडवला आणि फुटबॉल चाहत्यांच्या ओठांवर आपसूकच त्याचे नाव रुंजी घालू लागले.
बाराव्या वर्षी अलीरेझाला फुटबॉलचं वेड जडलं. पण वडिलांनी फुटबॉल खेळून पैसे मिळत नाहीत, असं म्हणत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांचे इरादे बुलंद असतात त्यांना कुणीही रोखू शकत नाही. आणि अलीरेझाच्या बाबतीत तसंच झालं. वडिलांनी त्याचे ग्लोव्ज फाडले. खेळाचा गणवेश फाडला. पण अलीरेझा मात्र डगमगला नाही. त्यानं घरंच सोडलं. नातेवाईकांकडून कर्जाने तेहरानला जाण्याचे पैसे घेतले. तेहरानला जाणाऱ्या बसमध्ये त्याला प्रशिक्षक हुसेन फेईज भेटले. त्याने आपली करुण कहाणी त्यांना ऐकवली. त्यांनी अलीरेझाला 30 युरो देण्यास सांगितले. अलीरेझाकडे एक पैसाही नव्हता. राहायला जागा नव्हती. हातात काम नव्हतं. तेहरानमधील आझाद टॉवर येथे निर्वासित लोकं रस्त्यावर राहायची, तिथे तो राहू लागला. त्यानंतर त्यानं एक फुटबॉल क्लब शोधला. त्या क्लबच्या बाहेरच्या रस्त्यावर तो झोपू लागला.
याबाबतची आठवण अलीरेझाने सांगितली. तो म्हणाला, " एकदा मी क्लबच्या बाहेर झोपलो होतो. लोकांना मी भिकारी वाटलो. सकाळी उठलो तर माझ्या आजूबाजूला पैसे पडलेले होते. त्या पैशांमुळेच मला पहिल्यांदा चांगल्या पदार्थांवर ताव मारता आला. "
हुसेन फेईज यांनी त्याला आपल्या क्लबमध्ये कुठलेही पैसे न घेता काही दिवसांनी सामील करून घेतले. अलीरेझाकडे उदरनिर्वाहाचे साधन नव्हते. त्यामुळे तो पहाटे उठून रस्त्यावर झाडू मारायचा. काही श्रीमंत लोकांच्या गाड्या धुवायचा. त्यामधून त्याला फक्त एकवेळचे जेवण मिळायचे. पण 23 वर्षांखालील संघाची जेव्हा निवड करण्यात आली तेव्हा त्या शिबीरामध्ये अलीरेझाने चमक दाखवली. त्यावेळी त्याच्या बाबतीत बरंच राजकारणही झालं. पण सूर्याला उगवण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, तसंच त्याचं झालं. अखेर त्याला 23 वर्षांखालील संघात स्थान दिलं आणि अलीरेझाने मागे वळून पाहिले नाही. विश्वचषकातून इराणचा संघ बाहेर पडला, पण अलीरेझा मात्र नायक झाला.
विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतरही अलीरेझा आपले जुने दिवस विसरलेला नाही. याबद्दल तो म्हणतो की, " आतापर्यंत अडथळ्यांची मॅरेथॉन पूर्ण करत मी इथपर्यंत पोहोचलो. माझं स्वप्न मी पूर्ण केलं. पण ते जूने दिवस मी विसरू शकत नाही. कारण एक व्यक्ती म्हणून मला घडवण्यात त्या दिवसांचा महत्त्वाचा वाटा आहे. "