FIFA Football World Cup 2018 : ‘युगोस्लाव्ह’चे ‘जीन्स’ जोपासणारे ‘क्रोएट्स’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 10:00 AM2018-07-09T10:00:00+5:302018-07-09T10:00:00+5:30
रशियाची विश्वचषकातील ‘एक्झिट’ फार चर्चेत नाही. पण क्रोएशियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे.
चिन्मय काळे : यंदाचा फुटबॉल विश्वचषक मातब्बरांना धक्का देणारा ठरतोय. या श्रेणीत आक्रमक रशियाला त्यांच्याच भूमीत जाऊन शांत खेळाने पराभूत करुन क्रोएशियाने फुटबॉल जगताला धक्का दिला. या सामन्यात रशियाची विश्वचषकातील ‘एक्झिट’ फार चर्चेत नाही. पण क्रोएशियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. या स्टायलिश विजयाद्वारे क्रोएशियाने एकप्रकारे त्यांचे ‘वडील’ युगोस्लाव्हियाचाच वारसा कायम ठेवला आहे.
क्रोएशिया, सर्बिया, हंगेरी, बल्गेरिया, आॅस्ट्रीया हे मुळात सर्व बाल्कन प्रदेश. दुसऱ्या महायुद्धापासून सातत्याने धुमसत असणाऱ्या या क्षेत्रात फुटबॉलचे भारी वेड. यापैकी क्रोएशिया, सर्बियायासारखे देश मूळ युगोस्लाव्हियाचा भाग. हा युगोस्लाव्हिया क्रोएशियासह अन्य पाचही देशांचा वडील. विघटनापर्यंत युगोस्लाव्हियाची फुटबॉल विश्वचषकातील कामगिरी चांगलीच राहिली आहे. हा संघ विश्वचषकात कधीच साखळीतून परतलेला नाही. किमान उप उपांत्यपूर्व फेरीपर्यंत गेला आहे. तर १७ वर्षाखालील विश्वचषकाचा युगोस्लाव्हिया दोन वेळा विजेता राहीला आहे.
१९९५ मध्ये युगोस्लाव्हियाचे विघटन झाले. सहा देश वेगळे झाले. त्यावेळी त्यांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात २५ टक्के खेळाडू क्रोएट्स होते. त्यापैकीच एक डेव्हॉर सूकर याने १९९८ मध्ये पहिल्याच स्पर्धेत संघाला उपांत्य फेरीत नेले व स्वत: सर्वाधिक गोल केले. मुख्य म्हणजे हे डेव्हॉर सूकर सध्या क्रोएशियन फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. विघटनानंतर देशाचे सहा भाग झाले तरी ‘वडील’ युगोस्लाव्हियाकडून फुटबॉलचे गुण व वारसा सर्वाधिक क्रोएशियानेच आत्मसाद केले. त्याचेच निकाल रशियाविरुद्धच्या सामन्यात दिसले.
सर्वसामान्य फुटबॉल चाहत्यांमध्ये रशिया असो वा क्रोएशिया या दोघांकडून अशा दमदार खेळाची अपेक्षा नव्हती. पण फुटबॉलकडे तंत्रशुद्ध दृष्टीने पाहणारे तज्ज्ञ सुरूवातीपासूनच क्रोएशियाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा बाळगून होते. रशियाने तर केवळ यजमानपदाचा लाभ घेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. त्याचआधारे त्यांच्या संघाने क्रोएशिया विरुद्धच्या लढतीत मनोबल वाढविणाऱ्या प्रेक्षकांच्या पाठींब्यावर आक्रमक खेळ केला. पण क्रोएशियाने तेवढ्याच शांतपणे सामना आक्रमक न होऊ देता रशियालासुद्धा संतुलित खेळासाठी बाध्य केले. एरवी अशाप्रकारचा खेळ जर्मनीकडून केला जातो. क्रोएशिया त्याच युरोपातील. दुसऱ्या महायुद्धात जर्मन आक्रमणाच्या झळा क्रोएट्स नागरिकांनीही सोसल्या होत्याच. कदाचित या सर्वांचे मिश्रण त्यांच्यातील फुटबॉल तंत्रात दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतात आज जर्मनी, इटली, स्पेन, नेदरलॅण्ड्ससारख्या संघांना फाइट देण्याची हिंमत जशी ब्राझील, अर्जेंटीना, उरुग्वे हे देशच दाखवतात. तशी १९५४ ते १९९० या काळात फुटबॉलमधील तेव्हाच्या दमदार संघांना लढा देण्याची हिंमत युगोस्लाव्हियाचा संघ दाखवत होता. त्याच युगोस्लाव्हियाच्या ‘जीन्स’ चा तंतोतंत वारसा कोणी उचलला असेल तर ते क्रोएट्स अर्थात क्रोएशिया आहे. यंदा तर त्यांची कामगिरी युगोस्लाव्हियापेक्षाही सरस होण्याची चिन्हे दिसत आहेत, हे नक्की.
स्वातंत्र्याचे मोल जाणून आहेत
क्रोएशिया देशाची निर्मिती हाल-अपेष्टा सहन करुन झाली. स्वत:चे वेगळे अस्तित्त्व असतानाही सर्बियाकडून सातत्याने या देशाला अन्याय सहन करावा लागला. त्यातून स्वातंत्र्य मिळाल्याचे मोल माहित असल्याने त्यांच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंदा ग्रॅबर कितारोव्हिच यांनी या ‘व्हीआयपी’ कक्षा सोडून आपल्या देशाच्या नागरिकांमध्ये जाऊन बसल्या. स्वभावातील हा साधेपणा क्रोएशियाच्या संघातील खेळाडूंकडून मैदानावरही दिसला.