FIFA Football World Cup 2018 : 'त्या' खेळाडूंवर विसंबून राहणे संघाला महागात पडले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:41 AM2018-07-01T04:41:28+5:302018-07-01T04:41:51+5:30
जगातील सर्व क्लब आणि देशांच्या बचावपटूंना आपल्या तालावर नाचवणारे दोन दिग्गज खेळाडू शनिवारी विश्वचषक स्पर्धेतून रिकामी हाताने बाहेर पडले. त्यांच्या चाहत्यांना हे दु:ख पचवणे कठीण आहे.
सोची - जगातील सर्व क्लब आणि देशांच्या बचावपटूंना आपल्या तालावर नाचवणारे दोन दिग्गज खेळाडू शनिवारी विश्वचषक स्पर्धेतून रिकामी हाताने बाहेर पडले. त्यांच्या चाहत्यांना हे दु:ख पचवणे कठीण आहे. पण फुटबॉल खेळाची हीच खरी जादू आहे. इथे आधीच्या विक्रमापेक्षा त्या दिवशी तो खेळाडू कसा खेळतो यावर त्या संघाचा निकाल अवलंबून असतो. पण इथे केवळ एका खेळाडूवर विसंबून राहणे महागात पडू शकते. हा सांघिक खेळ आहे आणि येथे मैदानावरील सर्व अकरा खेळाडूंची सांघिक कामगिरी महत्वाची असते. हेच गणित अर्जेंटिना आणि पोर्तुगाल या संघांना सोडवणे जमले नाही. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर अधिक विसंबून राहणे त्यांना महागात पडले. पण याला जर्मनीचा संघ अपवाद ठरला. सांघिक कामगिरीवर भर असलेला हा संघ साखळीतच बाहेर फेकला गेला. शनिवारी झालेल्या बाद फेरीच्या लढतीत फ्रान्सने अर्जेंटिनाचा (४-३), तर उरुग्वेने पोर्तुगालचा (२-१) असा पराभव केला. या पराभवाने त्यांचे स्पर्धेतील आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आले.
आर्जेंटिनाचा स्पर्धेपूर्वीचा आणि स्पर्धेतील प्रवास एकंदर चढ उताराचा राहिला. त्यात उतारच जास्त होता. त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा उरल्या नव्हत्या. पण अखेरचा (कदाचित) विश्वचषक खेळणाऱ्या मेस्सीकडून फार अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला. अर्जेंटिनाने त्याच्यावरील भार कमी करण्यासाठी सामन्यात प्रयोग केले, परंतु अन्य खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी न झाल्याने पुन्हा सर्व भार मेस्सीच्या खांद्यावर आला. त्यामुळे पुन्हा अर्जेंटिना संपूर्णतः मेस्सीवर अवलंबून राहिली. साखळी फेरीत त्याने संघाला तारले. मात्र फ्रान्सच्या उत्तम सांघिक खेळासमोर पुन्हा ते अपयशी ठरले. मेस्सीने त्याची कामगिरी चोख बजावली. पण त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही.
पोर्तुगालच्या बाबतीतही हेच घडले. रोनाल्डोवर अतिविसंबून राहणे महागात पडले. स्पेनविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात हॅटट्रिक करणाऱ्या रोनाल्डोला रोखण्याची रणनीती सर्वच संघानी योग्यरितीने आखली होती. उरुग्वेविरूध्द तो निष्प्रभ ठरला. उरुग्वेच्या बचावफळीने त्याला अचूक रणनीतीने रोखले आणि पोर्तुगालचा पराभव तेथेच निश्चित झाला. रोलाल्डोसाठी अखेरची विश्वचषक स्पर्धा असल्याने त्याच्यावर आलेले दडपण त्यालाही झेपले नाही.