FIFA FOOTBALL World Cup 2018: ग्रानिट झाका, शकिरी यांची चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:17 AM2018-06-25T02:17:44+5:302018-06-25T02:17:58+5:30
फिफा विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सर्बियाविरुद्धच्या सामन्यात गोल केल्यानंतर स्वित्झर्लंडच्या ग्रानिट झाका व झारडेन शकिरी यांनी ‘विशिष्ट’ हातवारे केले होते.
मॉस्को : फिफा विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सर्बियाविरुद्धच्या सामन्यात गोल केल्यानंतर स्वित्झर्लंडच्या ग्रानिट झाका व झारडेन शकिरी यांनी ‘विशिष्ट’ हातवारे केले होते. त्यांच्या या कृत्याची फिफाने चौकशी सुरू केली आहे.
स्वित्झर्लंडने चुरशीच्या झालेल्या सामन्यात सर्बियावर २-१ अशा गोलने मात केली होती. हे गोल झाल्यानंतर झाका व शकिरी यांनी आनंदोत्सव करताना आपल्या हातांनी गरुडाचे चिन्ह तयार केले होते. हे चिन्ह अल्बानियाच्या ध्वजाचे प्रतिनिधित्व करते, असे मानले जात आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंनी कोसोवोच्या समर्थनासाठीच हे कृत्य केल्याचा संशय आहे.
कोसोवोमध्ये राहणारे अनेक लोक अल्बानियन वंशाचे आहेत. हे दोन्ही
खेळाडू सर्बियाचा पूर्व भाग कोसोवोचे मूळ रहिवासी आहेत. कोसोवोने २००८ मध्ये स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. मात्र, सर्बियाने अद्याप त्याला मान्यता दिलेली नाही.
फिफाने मैदानात कोणत्याही प्रकारच्या राजकीय संदेश व प्रतीकांवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे या नियमाचे उल्लंघन
केल्याचे आढळल्यास झाका व शकिरी यांच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घातली जाऊ शकते.
त्याचबरोबर फिफाने सर्बियाच्या प्रशिक्षकांचीही चौकशी सुरू केली आहे. सर्बियाच्या प्रशिक्षकांनी जर्मनीचे पंच फेलिक्स ब्राइच यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती.