FIFA Football World Cup 2018 : ज्योकिम ल्यो तुम्हीच जर्मनीला तारु शकता...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 09:00 AM2018-06-29T09:00:00+5:302018-06-29T09:00:00+5:30
साहजिकच जर्मनीच्या या लाजिरवाण्या कामगिरीला जबाबदार ठरवून प्रशिक्षक ज्योकिम ल्यो यांच्या हकालपट्टीचा सूर आवळला जाईल.
स्वदेश घाणेकर : दक्षिण कोरिया सारख्या दुबळ्या संघाकडून रशियात गतविजेत्या जर्मनीचा झालेला मानहानीकारक पराभव हा फुटबॉलचा दर्दी चाहता असलेल्या प्रत्येकासाठी बोचरा होता. मेक्सिको विरूध्दच्या सलामीच्या पराभवातूनच जर्मनीचे मानसिक स्थैर्य ठिक नसल्याचे जाणवले होते. पण स्पर्धेतून ते इतक्या वाईट पध्दतीने बाहेर फेकले जातील असे नक्की वाटले नव्हते. साहजिकच या फुटबॉल विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीला जबाबदार ठरवून प्रशिक्षक ज्योकिम ल्यो यांच्या हकालपट्टीचा सूर आवळला जाईल. पण तो सूर गळ्यातून बाहेर पडण्याआधीच जर्मन फुटबॉल संघटनेने ल्यो २०२२ पर्यंत प्रशिक्षकपदी कायम राहतील असे स्पष्ट करून विरोधाची धार कुचकामी केली.
जर्मन संघासोबत २००४ पासून असलेल्या ल्यो यांना एका अपयशाने काढून टाकणे संघटनेलाही मान्य नाही. जुर्गेन क्लिन्समन यांच्या सोबत ल्यो यांनी जर्मन संघाचा मजबूत पाया रचला आहे. साहाय्यक प्रशिक्षक असलेल्या ल्यो यांनी क्लिन्समन यांच्या सोबत जर्मनीच्या खेळाची शैली बदलली. युरो २००४ च्या अपयशानंतर ल्यो यांनी जर्मनीला आक्रमक खेळाची ओळख करून दिली. क्लिन्समन आणि ल्यो यांच्या नव्या आक्रमक फिलोसॉफिने जर्मन संघात कायापालट घडवला. हे कार्य करत असतानाच ल्यो यांच्या सांगण्यावरून जर्मनीचा 'ब' संघाची उभारणी करण्यात आली. नुसती उभारणी करून ते थांबले नाही तर विविध स्पर्धांमध्ये तो संघ अन्य बलाढ्य संघांसमोर उतरवला. यश अपयशातून उभा राहण्यास शिकणाऱ्या त्या संघातून 'अ' संघासाठी अनेक नावाजलेले खेळाडू दिले.
क्लिन्समन यांनी करार वाढवण्यास नकार दिल्याने २००६ मध्ये ल्यो यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. एक एक लक्ष्य डोळ्यासमोर ठेउन ल्यो रणनीती आखू लागले आणि हे करत असताना त्यांनी क्लिन्समनसोबतच्या फिलोसॉफित कोणताही बदल केला नाही. चेंडूवर जास्त ताबा ठेवत मग पास देण्याची शैली त्यांनी खंडित केली. कोणत्याही खेळाडूने अधिक काळ चेंडू स्वतःकडे न राखता झटपट पासेस देण्याचा त्यांचा आग्रह असायचा आणि तो ते खेळाडूंकडून प्रत्यक्षात करवून घ्यायचे. त्यामुळेच एवढी वर्षे त्यांचा यशाचा आलेख चढाच राहिला.
२०१७ च्या कॉन्फडरेशन चषक स्पर्धेत संपूर्ण नवा संघ घेऊन ल्यो मैदानात उतरले. त्यांनी तयार केलेल्या या फळीने काय केले हे सर्वांनी पाहिलेच. जर्मनीने प्रथमच ही स्पर्धा जिंकली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्या. पण त्यावर ल्यो खरे उतरण्यात अपयशी ठरले. हे त्यांचे एकट्यांचे अपयश नव्हते तर २०१४ च्या जेतेपदामुळे खेळाडूंच्या अहंकाराचेही होते. मेक्सिकोविरूध्दच्या पहिल्याच धक्क्याने हे खेळाडू जमिनीवर आले आणि पुन्हा उठूच शकले नाही.
या मानहानीकारक पराभवाला ल्यो यांनाच जबाबदार धरून हकालपट्टी करून प्रश्न सुटणार नाही तर ते अधिक गंभीर होतील. कॉन्फडरेशन स्पर्धेत खेळवलेल्या दुसऱ्या फळीतील ते खेळाडू जर्मनीचे भविष्याचे नायक आहेत. त्यांना आकार देण्याचे काम ल्यो यांनी केले आहे आणि त्या हिऱ्यांचे पॉलिशिंगचे कामही तेच करु शकतात. रशियात खेळलेल्या संघातील बहुतेक खेळाडू येत्या दोनएक वर्षात निवृत्ती स्वीकारतील. त्यामुळे पुन्हा संघबांधणी करण्याचे काम नव्या प्रशिक्षकाला जमण्यासारखे नाही, म्हणूनच ज्योकिम ल्यो तुम्हीच जर्मनीला तारु शकता, अन्य कुणालाही ते काम झेपण्यासारखे नाही.