Fifa Football World Cup 2018 :मेस्सीच्या खेळाने चाहते सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:36 AM2018-06-28T02:36:22+5:302018-06-28T02:36:36+5:30
ज्याची सगळ्यांना आशा होती तेच झाले. अर्जेंटिनाने काल रात्री नायजेरियाला २-१ ने पराभूत केले. मला वाटते की, हा एक मोठा निकाल होता
अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
ज्याची सगळ्यांना आशा होती तेच झाले. अर्जेंटिनाने काल रात्री नायजेरियाला २-१ ने पराभूत केले. मला वाटते की, हा एक मोठा निकाल होता. एक मोठा विवाद सुरू होता. नेमके काय सुरू होते अर्जेंटिना आणि मेस्सीसोबत, चाहते नाराज होते. खेळाडूंचे प्रशिक्षकांसोबत वाद असल्याचेही समोर येत होते. मात्र ज्या प्रकारे संघ एकजुटीने खेळला ते पाहून वाटले नाही.
मेस्सीचा खेळ शानदार होता. मेस्सीला विश्वातील सर्वोत्तम खेळाडू का मानले जाते हे त्याने दाखवून दिले. त्याने पहिला गोल केला तो शानदार होता. लाँग पासवर त्याने बॉलला नियंत्रणात आणले आणि गोल केला. त्याच्या खेळात जादू आहे. कारण तो खूप हट्टाकट्टा खेळाडू नाही. मात्र त्याने चेंडूवर नियंत्रण मिळवले. बॉलला खाली पडू दिले नाही. वरच्यावर घेत गोलजाळीची दिशा दाखवली. मात्र १-१ ने बरोबरी झाली. पेनल्टीवर नायजेरियाने गोल केला. त्यावेळी असे वाटत होते की सामना बरोबरीत सुटेल आणि अर्जेंटिना फिफा विश्वचषकातून बाहेर होईल. मात्र अखेरच्या ५ मिनिटात अर्जेंटिनाला गोल मिळाला.
खास करून या विश्वचषकात मोरक्को आणि नायजेरियाने खूपच शानदार आणि आक्रमक खेळ केला. आधीच्या काळात डच संघ जसा खेळ करत होता, तसाच खेळ त्यांनी केला आहे. त्यांनी पासेस चांगले दिले. खेळाडूंमध्ये ताळमेळ चांगला होता. मात्र दुर्दैवाने हे दोन्ही संघ बाहेर झाले. पुढच्या स्पर्धांमध्ये त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागेल.
बड्या संघांचा विचार केला तर स्पेन, फ्रान्स,अर्जेंटिना, बेल्जियम, रशिया हे संघ बाद फेरीत पोहचले आहेत. आता सर्वांचे लक्ष जर्मनी आणि फ्रान्सवर आहे. जर ते पराभूत झाले तर ते बाहेर होऊ शकतात. विशेषत: जर्मनी. कारण त्यांनी या आधीदेखील एक सामना गमावला आहे. जर्मनी आणि ब्राझीलने अजून बाद फेरीत प्रवेश केलेला नाही. जर्मनी हे गतविजेते आहेत आणि ब्राझील विश्व रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. एक सामना त्यांनी ड्रॉ केला आहे. त्यामुळे त्यांना एक सामना जिंकावा लागेल. या मोठ्या संघांना फॉर्ममध्ये येण्यास काही वेळ लागला आहे.