FIFA Football World Cup 2018 : ‘पंचक ’भेदण्यास मेक्सिको प्रयत्नशील; बलाढ्य ब्राझीलविरुद्ध उपउपांत्यपूर्व लढत आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:50 AM2018-07-02T02:50:18+5:302018-07-02T02:52:47+5:30
मेक्सिको संघ फिफा विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत सोमवारी खेळेल त्यावेळी इतिहासाचे झुकते माप त्यांच्या बाजूने नसेल, पण सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत संघ बलाढ्य संघांना चकित करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे.
सेंट पीटर्सबर्ग : मेक्सिको संघ फिफा विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत सोमवारी खेळेल त्यावेळी इतिहासाचे झुकते माप त्यांच्या बाजूने नसेल, पण सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत संघ बलाढ्य संघांना चकित करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे.
मेक्सिकोने सलग सातव्यांदा विश्वकप प्री-क्वॉर्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे, पण संघाला यापूर्वी सहावेळा अंतिम १६ चा अडथळा पार करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पाचवा सामना खेळणे त्यांच्यासाठी मोठे लक्ष्य ठरले आहे. मेक्सिकोचा कर्णधार आंद्रेस गुआर्डेडो म्हणाला,‘पाचव्या लढतीत स्थान मिळवित इतिहास घडविणे यापेक्षा दुसरी कुठली संस्मरणीय कामगिरी नाही. मानसिकदृष्ट्या विचार करता आम्ही चांगले खेळाडू आहोत, पण आम्ही आगेकूच करण्यात यशस्वी ठरतो किंवा नाही, यावरच आमचे आकलन होईल. मेक्सिकोने यापूर्वी अंतिम १६ मध्ये थोड्या फरकाने लढती गमावल्या आहेत. संघाला १९९४ मध्ये बुल्गारियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. १९९८ व २००६ मध्ये अनुक्रमे जर्मनी व अर्जेंटिना या संघाविरुद्ध सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर सामने गमावले होते. चार वर्षांपूर्वी अखेरच्या क्षणी संघाला दोन गोल स्वीकारावे लागल्यामुळे पराभव पत्करावा लागला होता. आर्येन रोबेनने वादग्रस्त पेनल्टीवर गोल नोंदवत नेदरलँडला अंतिम आठमध्ये स्थान मिळवून दिले होते. (वृत्तसंस्था)
ब्राझीलचे खडतर आव्हान
ब्राझील संघाला संथ सुरुवातीनंतर लय गवसली असून त्यांचे आव्हान परतवणे मेक्सिको संघासाठी सोपे नाही. कोलंबियन प्रशिक्षक युआन कार्लोस ओसोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली मेक्सिको संघ बेदरकारपणे खेळत आहे. त्याचसोबत ते प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवित खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत.
संघाने सलामी लढतीत विश्व चॅम्पियन जर्मनीचा पराभव केला होता. त्या पराभवानंतर जर्मनी संघाला सावरताच आले नाही आणि ८० वर्षांत प्रथम विश्वकप स्पर्धेत त्यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.