FIFA Football World Cup 2018 : मेक्सिकोचा कोरियावर विजय, गटात अव्वल स्थानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 11:17 PM2018-06-23T23:17:34+5:302018-06-23T23:19:41+5:30
फिफा विश्वचषकात ग्रुप एफमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मेक्सिकोने कोरिया रिपब्लिकचा २-१ने पराभव केला. या विजयासह मेक्सिकोचे सहा गुण असून त्यांचा बाद फेरीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे
रोस्तोव आॅन डॉन : फिफा विश्वचषकात ग्रुप एफमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मेक्सिकोने कोरिया रिपब्लिकचा २-१ने पराभव केला. या विजयासह मेक्सिकोचे सहा गुण असून त्यांचा बाद फेरीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. तर कोरियाचे आव्हान स्पर्धेच्या साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. रोस्तोव अरेनात झालेल्या या सामन्यात मेक्सिकोच्या वेला कार्लोस (२६ मिनिट) आणि झेवियर हर्नान्डेझ (६६ मिनिट) यांनी गोल केले. तर दुसऱ्या हाफनंतर अतिरिक्त वेळेत कोरियाच्या एच.एम. सन याने गोल करत पराभवाचे अंतर कमी केले.
या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये मेक्सिकोच्या संघाने चांगलेच वर्चस्व गाजवले. मेक्सिकोने कोरियाच्या बचाव फळीला भेदत गोल करण्याचे चांगले प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळत नव्हते. कोरियाच्या एच.एस. जँग याने पेनल्टी बॉक्समध्ये हॅण्डबॉल केला. त्यामुळे मेक्सिकोला पेनल्टी बहाल करण्यात आली. कारकिर्दीतील ७० वा सामना खेळणाºया कार्लोस वेला याने पेनल्टी घेतली आणि गोल करत मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. पहिला हाफ संपला तेव्हा मेक्सिको १-० ने आघाडीवर होता.
विश्वचषक २०१८ मध्ये आतापर्यंत एकूण १४ पेनल्टी झाल्या आहेत. तर २०१४ च्या विश्वचषकात फक्त १३ पेनल्टी झाल्या होत्या.
दुस-या हाफच्या सुरूवातीपासूनच मेक्सिकोच्या संघाने पुन्हा कोरियाच्या गोलपोस्टवर जोरदार आक्रमणाला सुरुवात केली. ६६ व्या मिनिटाला झेवियर हर्नांन्डेझ याने गोल करत आघाडी दुप्पट केली. या हाफमध्ये कोरियाच्या संघाने काहीसा धसमुसळा खेळ केला. त्यामुळे कोरियाच्या चार खेळाडूंना पिवळे कार्ड मिळाले. दुसºया सत्रानंतर अतिरिक्त वेळेत कोरियाच्या एच.एम. सन याने गोल करत पराभवाचे अंतर कमी केले.
मेक्सिकोने बॉलवर ५९ टक्के नियंत्रण राखले तसेच गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. दोन सामन्यातील दोन विजयानंतर सहा गुणांसह मेक्सिको अव्वल स्थानावर आहे. तर कोरियाच्या संघाने दोन्ही सामन्यात पराभव पत्करल्याने त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. कोरियाचा साखळी फेरीतील अखेरचा सामना २७ जून रोजी जर्मनीविरोधात होणार आहे.