FIFA Football World Cup 2018 : सुपरस्टार्सचा अस्त?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:37 AM2018-07-02T02:37:39+5:302018-07-02T02:38:36+5:30
अर्जेंटिना आणि पोर्तुगालसह लिओ मेस्सी आणि रोनाल्डोची विश्वचषकातून गच्छंती. गत विश्वविजेत्यांपाठोपाठ विद्यमान युरोविजेतेही बाहेर गेले.
- रणजीत दळवी
ज्याची भीती, तसेच अपेक्षा होती ते अखेर घडले! अर्जेंटिना आणि पोर्तुगालसह लिओ मेस्सी आणि रोनाल्डोची विश्वचषकातून गच्छंती. गत विश्वविजेत्यांपाठोपाठ विद्यमान युरोविजेतेही बाहेर गेले. आता प्रश्न उरला तो कोणता? खरोखरच या दोन सुपरस्टार्सचा अस्त झाला? पुढचा विश्वचषक येईल, तेव्हा हे दोघेही पस्तीशीच्या पलीकडे गेलेले असतील, त्या वेळी ते खेळतील? आणि खेळलेच समजा, तर त्यांना जे ऐन भरात साध्य होऊ शकले नाही ते होईल? ते क्लब फुटबॉलमधील महान खेळाडू होते, यावर दुमत होणार नाही. या आधी चार वर्षांपूर्वी विश्वचषकाच्या अंतिम लढतीतील पराभवानंतर मेस्सी निवृत्त झाला होता. तशी घोषणा तो करण्याची शक्यता आहे.
शनिवारीच नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेत काही मोजके क्षण सोडता, दोघेही आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यात बरेच कमी पडले. मेस्सीने सुरुवात चांगली केली, पण त्यानंतर तो निस्तेज होत गेला. कोठे तो आपल्या फसव्या हालचालींनिशी प्रतिस्पर्धी बचावाला खिंडार पाडणारा किंवा तितक्याच सहजतेने सहकाºयांना भेदक पास देणारा मेस्सी? हे पाहताना फारच वेदना झाल्या. त्याचे ते मैदानात भटकणे, धावण्याऐवजी चक्क चालणे, ती खाली गेलेली मान, संघाच्या ओझ्याने खचलेले खांदे! त्याच्यासारख्याने ही स्पर्धा खेळण्याचा निर्णय का बरे घेतला? गतप्रतिष्ठा आणि अपेक्षांचे ओझे, याचा तो बळी ठरला.
त्यामानाने रोनाल्डोची अवस्था बरी होती. त्याने दोन वर्षांपूर्वी पोर्तुगालला युरो विजेतेपद मिळवून दिले होते. तो चांगला फिट होता, पण त्यायोगे प्रतिस्पर्धी बचाव भेदता येत नाहीत. त्याला मोकळ्या जागांमध्ये निर्णायक पासेस देणारा उच्च दर्जाचा मिडफिल्डर पोर्तुगालकडे नव्हता. किती गोल प्रयत्न रोनाल्डोने केले.
उरुग्वे आणि फ्रान्ससाठी हे विजय आत्मविश्वास वाढविणारे ठरावेत. मात्र, फ्रान्सचा संघ अनुभवात कमी दिसतो. त्यांची बचावफळीतील कमजोरी अर्जेंटिनाला काही काळ वरचढपणा बहाल करण्यास कारणीभूत ठरली, पण १९ वर्षीय एमबाप्पेच्या वेगवान चढायांनी त्यांच्या आघाडीच्या फळीला वेगळीच धार दिली. मिडफिल्डर ब्लेझ मातुइडीच्या दीर्घ पल्ल्याच्या थ्रू पासेसमुळे मग अर्जेंटिनाचे तीनतेरा वाजले!
एमबाप्पेच्या ती ६५-७० मीटरची धाव एखाद्या आॅलिम्पिक स्प्रिंटरसारखी होती. त्यामुळेच मग मार्कोस रोहोला त्याला पाडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अंतोन ग्रिझमनने त्या पेनल्टीवर किती थंडपणे गोल केला? दिवसेंदिवस तो अशाने आपल्या प्रतिष्ठेमध्ये भर टाकत आहे. फ्रान्सला पेनल्टी क्षेत्राच्या जवळपास फ्री किक मिळू देणे हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मुळीच परवडणार नाही, हेही त्याने दाखवून दिले. बेंजामिन पावर्डने जी तीसएक यार्डांवरून ‘हाफ - व्हॉली’वर गोल केला, तो दिवसातील सर्वोत्तम क्षण. चक्क जादुई! त्याचे रिप्ले असंख्य वेळा पाहिले जातील व त्यावर चर्चाही बरेच दिवस होईल. आजही २००२च्या विश्वचषकातील रॉबर्टो कार्लोसच्या फ्री किकचा विसर काही कोणालाच पडलेला नाही.
उरुग्वेच्या लुईस सुआरेझ व एडिसन कॅव्हिनी या जोडगोळीने केवळ तीन टचमध्ये केलेला गोलही प्रेक्षणीय होता. त्या हल्ल्याने पोर्तुगालला हादरविले. कॅव्हिनीचा दुसरा गोल कलाकुसरीचा उत्तम नमुना होता. पेपेने पोर्तुगालसाठी बरोबरी केली. मात्र, वयोमानानुसार खेळामध्ये कशी घसरण होते, हेही त्याला दुर्दैवाने अनुभवावे लागले. हेडरवर गोल केला व असाच उंच हल्ला मात्र डोक्याने नीटसा थोपविता न आल्याने, पेपे आणि पोर्तुगालचे परतीचे तिकीट निश्चित झाले. कॅव्हिनी मग दुखापतीने मैदानाबाहेर गेला. उरुग्वेसाठी ही चिंतेची बाब, पण पुढचे प्रतिस्पर्धी फ्रान्सला मात्र आनंदाची बातमी!