FIFA Football World Cup 2018 : सामन्यांचे शतक पूर्ण करणारा उरुग्वेचा गोलरक्षक!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 07:00 AM2018-06-27T07:00:00+5:302018-06-27T07:00:00+5:30
या गोलरक्षकाने उरुग्वेकडून १०० सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला. फर्नांडो मुस्लेरा असे या गोलरक्षकाचे नाव.
सचिन कोरडे : यजमान म्हणजेच रशिया संघाचा ३-० ने धुव्वा उडवत उरुग्वे संघाने यंदाच्या विश्वचषकातील विजयाची हॅट्ट्रिक साधली. या संघाने आपल्या कामगिरीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मानांकनात हा संघ रशियापेक्षा वरचढ होता, हे मान्य असले तरी या संघातील खेळाडूंनी ज्या पद्धतीने प्रदर्शन केले त्यावरून विजयाचे हकदार त्यांनाच म्हणावे लागेल. प्रशिक्षक ऑस्कर तबारेझ यांनी संघाची चांगली बांधणी केली. त्यात सर्वात मोठा विश्वासू खेळाडू आहे तो म्हणजे त्यांचा गोलरक्षक. या गोलरक्षकाने उरुग्वेकडून १०० सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला. फर्नांडो मुस्लेरा असे या गोलरक्षकाचे नाव. अशी कामगिरी करणारा हा ३२ वर्षीय या खेळाडू उरुग्वेचा सातवा गोलरक्षक आहे. विश्वचषकातील हा त्याचा १४ वा सामना होता. यापूर्वी २०१० मध्ये तो ७ सामने खेळला. २०१४ मध्ये चार आणि यंदाच्या विश्वचषकात ३ सामने खेळला आहे.
यंदाच्या विश्वचषकात उरुग्वेसाठी त्याची कामगिरी प्रशंसनीय ठरली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या संधी मोडून काढण्यात या खेळाडूने कसलीही कसर सोडलेली नाही. ११ जून २०१० रोजी त्याने विश्वचषकात पदार्पण केले होते. फ्रान्सविरुद्ध त्याच पहिला सामना होता. फ्रान्सला त्यांनी गोलशून्य अशा बरोबरीवर रोखले होते. विश्वचषकात दीर्घकाळ आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवणारा गोलरक्षक म्हणून त्याचे नाव आघाडीवर आहे. विश्वचषकात आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवणारा फर्नांडो संघाचा मुख्य खेळाडू आहे.