FIFA Football World Cup 2018 : वाट सर्वांसाठी खडतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:50 AM2018-07-01T04:50:40+5:302018-07-01T04:50:53+5:30

तुमच्यापर्यंत हे पोहोचेल तेव्हा दोहोंच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळालेल्या असतील. समजा अर्जेंटिना आणि पोर्तुगालची गच्छंती झाली असेल तर रोनाल्डो की मेस्सी हा वाद तुर्तास तरी बाजूला जाईल. या दोघांचे घरी जाणे स्पेनसाठी लाभदायी ठरावे.

FIFA Football World Cup 2018: Wait for all! | FIFA Football World Cup 2018 : वाट सर्वांसाठी खडतर!

FIFA Football World Cup 2018 : वाट सर्वांसाठी खडतर!

Next

- रणजित दळवी

तुमच्यापर्यंत हे पोहोचेल तेव्हा दोहोंच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळालेल्या असतील. समजा अर्जेंटिना आणि पोर्तुगालची गच्छंती झाली असेल तर रोनाल्डो की मेस्सी हा वाद तुर्तास तरी बाजूला जाईल. या दोघांचे घरी जाणे स्पेनसाठी लाभदायी ठरावे. पण त्यापूर्वी स्पेनला यजमानांचे तसे सोपे आव्हान संपवावे लागेल. पण खेळातील अनिश्चिततेचे काय? स्पेनचे मग संभाव्य प्रतिस्पर्धी असू शकेल जबरदस्त फॉर्ममधील क्रोएशिया, ज्यांच्यापाशी किमान अंतिम फेरीत धडक मारण्याची क्षमता आहे. फ्रान्स आणि उरुग्वे हेसुद्धा तुल्यबळ आहेत. तेव्हा विजेतेपदाच्या शर्यतीत आपणही आहोत, हे कोणी मानत असेल तर गैर काय?
स्पर्धेच्या ‘ड्रॉ’नुसार खालच्या अर्ध्यामध्ये आहे ब्राझील. अगदी त्यांचा फॉर्म खराब असला किंवा त्यांचा संघ ताकदवान नसला तरी त्यांची भीती ही असतेच. त्यांचे पुढचे प्रतिस्पर्धी असू शकेल बेल्जियम आणि यांच्यातील विजेत्याला कोलम्बिया किंवा इंग्लडसह स्वीडन, स्वित्झर्लंडपैकी एकाशी मुकाबला करावा लागेल. काही पंडित इंग्लडने पनामासारख्या नवोदितांविरुद्ध प्रदर्शित केलेल्या फॉर्मचा दाखला देऊ लागले आहेत. फुटबॉल विश्वातील तिसरा सुपरस्टार नेमारच्या हाती ब्राझीलच्या प्रगतीच्या चाव्या आहेत. त्याला वेगळे काही करावेच लागेल. शिवाय आपल्या सहकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून स्वार्थीपणाने गोलसंधी दवडणे ब्राझीलला व त्याला महाग पडेल. प्रयोग करण्याची ही वेळ नाही.
बाद फेरीचा पहिला टप्पा सर्व विजयी होणाºया संघांविषयी अनुमान बांधण्यासाठी उपयुक्त तसेच महत्त्वाचा ठरणार आहे. पंधरवड्याभरामध्ये चार लढती व तितक्यात दिवसात आणखीन तीन खडतर मुकाबले म्हणजे हिमालय चढण्याइतकेच कठीण! एव्हाना दुखापती, खेळाडूंची झालेली शारीरिक दमछाक आणि मानसिक थकवा यामुळे त्यांच्या कामगिरीवर बºयापैकी परिणाम झालेला असणार. गेल्या चार वर्षांतील मेहनत आणि नियोजन यांची जणू कसोटी! त्यात परत ‘नशीब’ नावाच्या मित्राची साथही हवी. आपण अथवा प्रतिस्पर्ध्याने मिळवलेली-गमावलेली पेनल्टी, रेफरीची न परवडणारी चूक (अगदी व्हीएआर दिमतीला असूनदेखील) यासारख्या घटना स्पर्धेमध्ये निर्णायक ठरतात.
याशिवाय काही प्रमुख खेळाडूंना आपल्या भूमिका योग्य प्रकारे पार पडाव्या लागतात. असे दोन-चार खेळाडू प्रत्येक संघात असतात. सारा भार त्यांच्यावरच तर असतो! त्यांनी चांगले प्रदर्शन करावे ही देशवासियांची अपेक्षा तशीच सहकाºयांचीही असते. स्पेनसाठी इनिएस्टा, योर्गेसिल्वा, रॅमॉस आणि डेही त्यांचे या स्पर्धेतले प्रदर्शन सुमार असूनही डेही याची भूमिका महत्त्वाचीच असेल.
क्रोएशियाचा हुकमी एक्का आहे ल्युका मॉड्रीक. मी पण एक सुपरस्टार आहे, हे सिद्ध करण्याची त्याला उत्तम संधी आहे. त्याला रॅकिटिच आणि पोरिसिच या दोन आयव्हन नावाच्या खेळाडूंची साथ अत्यावश्यक आहे. ख्रिस्तियन एरिक्सन आणि कॅस्पर श्मायकेल हे डेन्मार्कचे आधारस्तंभ आहेत. पण तीन सामन्यांत फक्त दोन गोल, हे त्यांच्या गोल करण्याच्या क्षमतेविषयी योग्य संकेत निश्चित नाहीत. पण गोलरक्षक श्यामकेल प्रतिस्पर्ध्यांना सहजासहजी गोल करू देत नाही, हेही लक्षात घ्यावयास हवे.
बेल्जियमकडे गुणवत्ता खूपच आहे. ती ओसंडून वाहते आहे. त्यांच्यापाशी हॅझार्ड आणि लुकाकूसारखे अव्वल शिकारी आहेत. त्यांचा गोलवरचा नेम सहजासहजी चुकणारा नाही. कोम्पनी, व्हर्मायलेन आणि गोलरक्षक कुर्तोआ बचावफळीला केवढा भकक्कमपणा देतात. अदनान यानुझायसारख्या प्रतिभशाली खेळाडूला पहिल्या अकरामध्ये सहज स्थान मिळत नाही, यावरूनच त्यांची श्रीमंती दिसून येते. ब्राझील किंवा बेल्जियम यापैैकी एकाला उपांत्यफेरीआधी घरची वाट पाहावी लागते, ही तशी शोकांतिकाच नाही का? इंग्लडने नेहमीच अपेक्षाभंग केला असल्याने हॅरी केनच्या संघाला ती प्रतिमा बदलण्यासाठी झटावे लागेल. हॅमेश रॉड्रिक्स जर फिट असेल तर कोलंबिया इंग्लडच्या वाटेतील अडथळा बनू शकते. बाकी प्रत्यक्षात जे काही होईल ते सर्वांनाच स्वीकारावे लागते. सर्वांचीच वाट खडतर आहे.

Web Title: FIFA Football World Cup 2018: Wait for all!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.