Fifa Football World Cup 2018 :...जेव्हा गोलांची बरसात झाली! विश्वचषकातील 6 सामन्यात मध्यंतराआधीच 5 गोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 04:16 PM2018-06-25T16:16:15+5:302018-06-25T16:16:42+5:30

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी इंग्लंडने झंझावाती खेळ करत पनामाविरुद्ध गोलांची अक्षरशः बरसात केली. पहिल्या 40 मिनिटांतच चार गोल नोंदले गेले आणि मध्यंतराला इंग्लंडचा संघ 5-0 असा पुढे होता.

Fifa Football World Cup 2018 : When goals rained in World Cup Match | Fifa Football World Cup 2018 :...जेव्हा गोलांची बरसात झाली! विश्वचषकातील 6 सामन्यात मध्यंतराआधीच 5 गोल

Fifa Football World Cup 2018 :...जेव्हा गोलांची बरसात झाली! विश्वचषकातील 6 सामन्यात मध्यंतराआधीच 5 गोल

Next

- ललित झांबरे 
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी इंग्लंडने झंझावाती खेळ करत पनामाविरुद्ध गोलांची अक्षरशः बरसात केली. पहिल्या 40 मिनिटांतच चार गोल नोंदले गेले आणि मध्यंतराला इंग्लंडचा संघ 5-0 असा पुढे होता. पहिल्या सत्रातील हा खेळ बघता विश्वचषकाच्या एकाच सामन्यात सर्वाधिक 10 गोल करण्याचा हंगेरीचा विक्रम इंग्लंडचा संघ मोडतो की काय असे वाटत होते, परंतु मध्यंतरानंतर हॕरी केनची हॅटट्रिक पूर्ण करणारा गोल वगळता पनामाने आणखी गोल होऊ दिले नाहीत. त्यामुळे इंग्लंडचा गोलांचा धडाका षटकारावरच थांबला मात्र विश्वचषक स्पर्धेत मध्यंतरालाच 5-0 अशी आघाडी सहाव्यांदा बघायला मिळाली. 

लागोपाठ दुसऱ्या विश्वचषकात मध्यंतराला असा स्कोअर फलकावर लागला. गेल्यावेळच्या स्पर्धेत जर्मनीने उपांत्य फेरीत ब्राझीलचा 7-1 असा धुव्वा उडविला होता त्यावेळी जर्मनीने पहिल्या 29 मिनिटांतच पाच गोल केले होते. मात्र शब्दशः गोलांची झडी लागली असे म्हणता येईल, असा सामना विश्वचषक स्पर्धेत 26 जून 1954 रोजी खेळला गेला.

उपांत्यपूर्व फेरीच्या त्या  सामन्यात अॉस्ट्रियाने यजमान स्वित्झर्लंडला 7-5 अशी मात दिली त्या एकूण 12 गोलांपैकी 9 गोल मध्यंतराआधीच अगदी 40 मिनिटातच झाले होते. अॉस्ट्रियन संघाकडून 42 व्या मिनिटाला पेनल्टी हुकली नसती तर पहिल्या सत्रातच 10 गोल फळ्यावर लागले असते. या सामन्यातील  मध्यंतराआधीच्या  9 गोलांमध्ये  अॉस्ट्रियाचे 5 आणि स्वित्झर्लंडचे 4 गोल होते.

विश्वचषक स्पर्धेच्या आणखी एका सामन्यात पहिल्या सत्रात  6 गोल नोंदले गेले आहेत. तो सामना होता 18 जून 1974 रोजीचा. त्यात युगोस्लाव्हियाने झैरेचा 9-0 असा धुव्वा उडवताना मध्यंतरालाच 6-0 अशी आघाडी घेतलेली होती आणि हे सहा गोल पहिल्या 35 मिनिटातच झालेले होते.

1966 च्या स्पर्धेत पोर्तुगाल आणि उत्तर कोरियाचा सामना गोलांच्या बरसातीत नाट्यमय  ठरला. कोरियन संघाने पहिल्याच मिनिटाला गोल करुन खळबळजनक सुरुवात केली. यानंतर त्यांनी आणखी 22 व 25 व्या मिनिटाला गोल करत 3-0 अशी आघाडी घेतली होती मात्र नंतर पोर्तुगालने 27 व 43 व्या मिनिटाला केलेल्या गोलांमुळे मध्यंतराला कोरियाकडे 3-2 अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात मात्र कोरियन संघ एकही गोल करू शकला नाही आणि शेवटी त्यांनी हा सामना 5-3 असा गमावला.

1974 च्या स्पर्धेत पोलंडने हैतीला 7-0 अशी मात देताना रॉबर्ट गाडोचाच्या हॅटट्रिकसह मध्यंतरालाच 5-0 अशी आघाडी घेतलेली होती. अशाप्रकारे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत सहा सामन्यात पहिल्या सत्रातच पाच किंवा अधिक गोल नोंदले गेलेले आहेत.

*काय आहे विश्वविक्रम* 
यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय सामन्याचा विश्वविक्रम मध्यंतराला 16-0 आणि पूर्णवेळेनंतर 31-0 असा आहे. सामन्याच्या दोन्ही सत्रात अशी सारखीच गोलांची बरसात अॉस्ट्रेलियन संघाने 2002 च्या विश्वचषक पात्रता सामन्यात अमेरिकन सामोआ संघाचा धुव्वा उडवताना केली होती. त्या सामन्यात मध्यंतराआधी 10, 12, 13, 14, 17, 19,  21,  23, 25, 27, 29, 33, 33, 37, 42, 45 व्या मिनिटाला गोल झाले होते. 33 व्या मिनिटाला तर एकाच मिनिटात दोन गोल होण्याचा अविश्वसनीय विक्रम घडला.

मध्यंतराआधी पाच किंवा अधिक गोल झालेले विश्वचषक सामने

दिनांक            विजयी     पराभूत     अंतर  मध्यंतर

26/06/54   अॉस्ट्रिया     स्वित्झर्लंड   7-5    5-4
23/07/66   पोर्तुगाल     उ. कोरिया    5-3    2-3
18/06/74   युगोस्लाव्ह  झैरे              6-0    9-0
19/06/74   पोलंड          हैती             7-0    5-0
08/07/14   जर्मनी        ब्राझील        7-1    5-0
24/06/18   इंग्लंड        पनामा          6-1    5-0

Web Title: Fifa Football World Cup 2018 : When goals rained in World Cup Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.