FIFA Football World Cup 2018 : भावी ‘सुपरस्टार’ कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 12:20 AM2018-07-06T00:20:11+5:302018-07-06T00:20:59+5:30
कोण होऊ शकतो उद्याचा सुपरस्टार? अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या गच्छंतीनंतर लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो यांचा वारसदार कोण? या दोघांनी निराश केले तरी तिसरा सुपरस्टार नेमार अजूनही रिंगणात आहे. मात्र त्याने आपल्या ‘नाटकी’ वृत्तीमुळे बरीच लोकप्रियता गमावताना फुटबॉल चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे.
रणजीत दळवी (गोलपोस्ट)
कोण होऊ शकतो उद्याचा सुपरस्टार? अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या गच्छंतीनंतर लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो यांचा वारसदार कोण? या दोघांनी निराश केले तरी तिसरा सुपरस्टार नेमार अजूनही रिंगणात आहे. मात्र त्याने आपल्या ‘नाटकी’ वृत्तीमुळे बरीच लोकप्रियता गमावताना फुटबॉल चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे.
सुपरस्टारपदाला पोहोचण्यासाठी कष्ट करावे लागतात व त्यासाठी वेळही लागतो. तेव्हा नाव प्रथम समोर येते लुईस सुआरेझचे. २०१२चे लंडन आॅलिम्पिक आणि तिसरा विश्वचषक असा त्याचा प्रवास. वयाच्या ३१व्या वर्षी १०२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५३ गोल केल्यानंतर त्याचा दावा प्रबळ दिसतो. पण चार वर्षांपूर्वी त्याने जॉर्जियो चिएलिनीचा घेतलेला ‘चावा’ त्याला निश्चित सतावत असणार. त्याच्या कारकिर्दीवरचा तो सहजासहजी पुसला न जाऊ शकणारा ‘डाग’! तो पुसण्यासाठी त्याला उरुग्वेला विजेतेपद मिळवून द्यावेच लागेल. त्याचा सहकारी एडिन्सन कॅव्हानीसुद्धा तेथे पोहोचू शकतो. त्यानेही ४५ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. ही लहानसहान कामगिरी नव्हे! एक संधी साधणारा व फ्री-किक्सचा बादशाह अशी त्याची ओळख आहे.
या पंक्तीत क्रोएशियाचे ल्युका मॉद्रिक आणि आयव्हन रॅकिटीच बसू शकतात. त्यांना रिआल माद्रिद आणि बार्सिलोनामध्ये बड्यांच्या सावलीत राहावे लागले हे त्यांचे नशीब! कल्पक खेळ करणारा मॉद्रिक एक चांगला ‘स्कोअरर’ आहे. आपले कौशल्य आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्याने आपल्या शारीरिक कमजोरीवर मात केली आहे. रॅकिटीच आहे दणकट, तो गोलही करतो; पण तो मॉद्रिकपेक्षा किंचित मागे आहे. बेल्जियमचे ईडन हॅझार्ड, रोमेलू लुकाकू, ब्राझीलचे विलियन सिल्वा, फिलिफ कुटिन्हियो या तरुणांनी आपले भविष्य उज्ज्वल असल्याचे सिद्ध केले आहे. त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ते उत्सुक आहेत. आम्ही वरच्या ‘क्लास’मधले आहोत हे दाखविण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. पॉल पॉगबा (फ्रान्स) आणि स्पर्धेमध्ये आतापावेतो सर्वाधिक गोल करणारा हॅरी केन (इंग्लंड) यांनीदेखील आपली छाप पाडली आहे.
हॅझार्डकडे अतुलनीय कौशल्यासह वेग आणि ‘फिनिशिंग’ हे अनमोल गुण आहेत. भीमकाय लुकाकू हा प्रतिस्पर्धी बचावफळीला एखाद्या बुलडोझरप्रमाणे उद्ध्वस्त करून डाव्या पायाने ताकदवान फटके हाणून प्रचंड हानी करतो. विलियन आणि कुटिन्हो यांच्याकडे नैसर्गिक गुणवत्ता विपुल आहे. बहुतेक ब्राझीलीयन्सकडे ती असतेच. त्यांची मध्यक्षेत्रातील प्रचंड मेहनत आणि बचावभेदक पासेस, त्यांची उपद्रवक्षमता आणि उपयुक्तता त्यांचे मोठेपण दाखवतात.
तरुण जॉर्डन पिकफोर्ड हा इंग्लंडला गवसलेला हिरा आहे. बेल्जियम आणि फ्रान्सचे गोलरक्षक थिबॉ कुर्ताेआ आणि ह्युगो लॉरिस यांच्यापाशी प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या तुलनेत रशियाचा हुकमी एक्का आणि इगॉर अकिनफीव दुर्दैवाने एका दुबळ्या संघाच्या अग्रस्थानी आहे.
पॉल पॉगबाने गेल्या पाच वर्षांत स्टारपदाला पोहोचताना आपण एक कल्पक मिडफिल्डर तसेच चांगले ‘स्कोअरर’ आहोत, हा लौकिक जपला आहे. २४ वर्षीय हॅरी केनचा दावाही मजबूत आहे. त्याची वेगवान आक्रमणे इंग्लंडला लाभदायी ठरत आहेत. तो आपल्या संघाला अंतिम फेरीत घेऊन गेल्यास त्याला ‘सुपरस्टार्स’मध्ये गणता येईल. अनेक दशकांनंतर इंग्लंडसाठी तो सुवर्णक्षण तर असेलच, पण मुळातच त्यांच्या दर्जेदार व आर्थिकदृष्ट्या भक्कम प्रीमिअर लीगसाठी वरदान ठरावे.
फ्रान्सचा १९ वर्षीय कायलियन एमबाप्पेने आपल्या पदार्पणातच आपला वेग, गोल करण्याच्या क्षमतेबरोबर खेळाची समज याच्या बळावर ‘सुपरस्टार’ बनण्यासाठी आवश्यक गुणवत्तेचे मुबलक प्रमाणात प्रदर्शन केले आहे. रोनाल्डो, ब्राझीलचा बरे का... याच्यासारखाच जणू दिसणारा आणि त्याच्या खेळाचे प्रतिबिंब वाटणारा एमबाप्पे एक दिवस अनभिषिक्त सम्राट पेलेचा वारसदार बनेल?