FIFA Football World Cup 2018 ; झ्लात्को दालिक : क्रोएशियाच्या यशामागचा जादूगार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:55 PM2018-07-13T12:55:13+5:302018-07-13T12:55:13+5:30
सौदी अरेबियासारख्या आखाती देशांत प्रशिक्षक म्हणून तब्बल चार वर्षे तिथल्या फुटबॉलमध्ये संजीवनी ओतण्यात सिंहाचा वाटा उचलणारे झ्लात्को दालिक हे क्रोएशियाच्या ऐतिहासिक यशामागचे जादूगार आहेत.
सचिन खुटवळकर
सौदी अरेबियासारख्या आखाती देशांत प्रशिक्षक म्हणून तब्बल चार वर्षे तिथल्या फुटबॉलमध्ये संजीवनी ओतण्यात सिंहाचा वाटा उचलणारे झ्लात्को दालिक हे क्रोएशियाच्या ऐतिहासिक यशामागचे जादूगार आहेत. जिथे मातब्बर संघांची व्यवस्थापने विश्वचषक स्पर्धेसाठी ३ ते ४ वर्षे मेहनत घेतात, तिथे केवळ आठ महिन्यांपूर्वी प्रशिक्षकपदाचा ताबा घेऊन क्रोएशियाला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थेट अंतिम फेरीत पोहोचविण्याची कमाल दालिक यांनी करून दाखविली.
देशाच्या फुटबॉल संघासाठी बचावफळीत योगदान दिल्यानंतर दालिक क्लब पातळीवरील संघांच्या बांधणीत रमले. क्रोएशियाच्या २ वर्षांखालील संघालाही त्यांनी मार्गदर्शन केले. परंतु त्यांनी खरी छाप सोडली ती आखातात. सौदी अरेबियामध्ये विविध क्लबच्या प्रशिक्षकपदी राहून त्यांनी तिथल्या खेळाडूंच्या कौशल्यात भर टाकली. अल फैैसली, अल हिलाल ब, अल हिलाल, अल आइन या प्रमुख फुटबॉल क्लबमध्ये त्यांनी २0१0 ते २0१७ या काळात सेवा बजावली. आॅक्टोबर २0१७मध्ये त्यांची क्रोएशियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आणि त्यांनी संघाच्या ऐतिहासिक भरारीचा जणू ध्यासच घेतला. पात्रता फेरीपासून ते मुख्य स्पर्धेपर्यंत दालिक यांनी क्रोएशियन फुटबॉलपटूंना सर्व प्रकारच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे धडे दिले. कठोर मेहनत, आत्मविश्वास आणि अखेरपर्यंत हार न मानण्याची वृत्ती या त्रिसूत्रीवर त्यांनी संघाची बांधणी केली.
लुका मॉद्रिक या अवलियाच्या कप्तानपदाखाली क्रोएशियाने विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या फेरीची झोकात सुरुवात केली ती अर्जेंटिनासारख्या मातब्बर संघाला ३-0 अशी धूळ चारून. साखळी फेरीतील तीनही सामने जिंकून अंतिम १६ संघात दिमाखात प्रवेश केला. उपउपांत्य सामन्यात डेन्मार्क व उपांत्यपूर्व फेरीत रशियाविरुद्ध क्रोएशियाच्या कौशल्याचा कस लागला. इंग्लंडविरुद्ध पारडे काहीसे हलके असतानाही क्रोएशियन खेळाडूंनी विजयाला गवसणी घालत संघाला प्रथमच अंतिम फेरी गाठून दिली. हे तीनही सामने निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ चालले व तीनही सामन्यात 0-१ अशी पिछाडी भरून काढण्याची किमया क्रोएशियाने केली. डेन्मार्क व रशियाविरुद्धचे सामने अतिरिक्त वेळेतही बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला. त्यात डॅनिजेल सबासिक या गोलरक्षकाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामन्यात क्रोएशियाने पिछाडीवरून विजय मिळविला आणि अंतिम सामन्यात फ्रान्सला धोक्याचा इशारा दिला. अर्थात प्रशिक्षक दालिक यांचे मार्गदर्शन व व्यूहरचना निर्णायक ठरली.
१९९८ साली फ्रान्समध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाला फ्रान्सकडून १-२ अशी हार पत्करावी लागली होती. त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास क्रोएशियन उत्सुक असतील. प्रशिक्षक दालिक, कप्तान मॉद्रिक ही जोडगोळी फ्रान्सचे आव्हान मोडून काढण्यास सज्ज झाली आहे.