FIFA U-17 World Cup : चुरशीच्या लढतीत भारताचा 2-1नं पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 10:07 PM2017-10-09T22:07:43+5:302017-10-09T22:53:09+5:30

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे

FIFA U-17 World Cup: India's 2-1 defeat in Churashi | FIFA U-17 World Cup : चुरशीच्या लढतीत भारताचा 2-1नं पराभव

FIFA U-17 World Cup : चुरशीच्या लढतीत भारताचा 2-1नं पराभव

Next

नवी दिल्ली - १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतानं कोलंबियाला चांगलीच टक्कर दिली. कोलंबियानं पहिला गोल करत भारतीय संघावर दडपण निर्माण केलं. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारताचा एकतर्फी पराभव होईल असे वाटत असतानाच भारतानं गोल नोंदवत सामन्यात बरोबरी केली. मात्र पुढच्याच क्षणाला कोलंबियानं गोल नोंदवत भारतावर आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत भारताला संधी दिली नाही. आणि भारतानं हा सामना 2-1 अशा फरकानं गमावला.  लागोपाठ दोन सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यामुळे या स्पर्धेत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं आहे. साखळी फेरीत भारत आपला शेवटचा सामना घानाविरुद्ध 12 ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यामुळे आपला शेवटचा सामना जिंकून भारत या स्पर्धेचा शेवट गोड करतो का हे पहावं लागणार आहे.

पहिल्या सत्रात भारतीय संघाने कोलंबियाच्या संघाला चांगलच झुंजवलं. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आलं. कोलंबियाच्या खेळाडूंनी केलेलं आक्रमण यजमान संघाचा गोलकिपर धीरज सिंहने मोठ्या शिताफीने परतवून लावलं. पहिल्या सत्रात कोलंबियाच्या संघाला एकही गोल करु न देण्यात धीरज सिंहचा मोठा वाटा होता. त्याने कोलंबियाच्या खेळाडूंनी मारलेले सुरेख फटके गोलपोस्टमध्ये जाण्यापासून रोखले. पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनीही कोलंबियावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न हे फोल ठरले.

मात्र दुसऱ्या सत्रात कोलंबियाच्या खेळाडूंनी आपल्या आक्रमणात आणखी धार आणत 48 व्य़ा मिनीटाला आपला पहिला गोल झळकावला. ज्युआन पेनालोझाने पहिला गोल झळकावत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या या आक्रमणामुळे भारतीय संघ काहीसा बॅकफूटवर गेलेला पहायला मिळाला. यानंतर भारतीय संघाने कोल्हापूरचा खेळाडू अनिकेत जाधवला संघात जागा दिली. मात्र भारतीय खेळाडूंना गोल करण्यात यश येत नव्हतं. अखेर 82 व्या मिनीटाला जॅक्सन सिंहने ही कोंडी फोडत हेडरवर सुरेख गोल झळकावत सामन्यात बरोबरी साधली. हा भारताचा विश्वचषक स्पर्धेतला पहिला गोल ठरला.मात्र यानंतर अवघ्या एका मिनीटाच्या आत भारतीयांच्या आनंदावर विरझण पडलं. पहिल्या गोलनंतर जल्लोषात रमलेल्या भारतीय खेळाडूंचा फायदा उचलत कोलंबियाच्या खेळाडूंनी भारतीय गोलपोस्टवर आक्रमण केलं. 83 व्या मिनीटाला ज्युआन पेनालोझाने सामन्यात आणखी एक गोल झळकावत कोलंबियाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या या गोलदरम्यान भारताच्या बचावफळीचा एकही खेळाडू आपल्या जागेवर हजर नव्हता. याचा फायदा उचलत कोलंबियाने पुन्हा एकदा सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

Web Title: FIFA U-17 World Cup: India's 2-1 defeat in Churashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.