FIFA U-17 World Cup : जर्मनी, कोस्टारिकाचे लक्ष नॉकआउट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 03:38 AM2017-10-07T03:38:50+5:302017-10-07T03:38:56+5:30
गोव्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी (दि.७) दोन सामने रंगणार आहेत. त्यातील जर्मनी-कोस्टारिका या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सचिन कोरडे
गोव्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी (दि.७) दोन सामने रंगणार आहेत. त्यातील जर्मनी-कोस्टारिका या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जर्मनी संघाला अनेकांनी पासंती दिली आहे. त्यामुळे या सामन्याविषयी उत्सुकता लागली आहे. १७ वर्षांखालील विश्वचषकात जर्मनीला आतापर्यंतही चॅम्पियन होता आले नाही. त्यामुळे भारतात विश्वचषक जिंकण्यासाठीच दाखल झाल्याचे त्यांच्या प्रशिक्षकांनी सांगितले. असे असले तरी आमचे पहिले लक्ष्य हे ‘नॉकआउट’ फेरीत प्रवेश करण्याचे असेल. असे सांगत जर्मनीचे प्रशिक्षक क्रिस्टियन कुक यांनी आपला इरादा स्पष्ट केला. दुसरीकडे, कोस्टारिकाचे प्रशिक्षक विकेज यांनीही ‘नॉकआउट’लाच प्राधाल्य असल्याचे म्हटले. बाद फेरीनंतर रणनीती आणि संघबदल पाहायला मिळतील. त्याआधी, आम्ही सर्वाेत्तम खेळ करत आमचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे विकेज म्हणाले.
या स्पर्धेत जर्मनी दहा वेळा उतरलेला आहे; पण त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. गेल्या चार दिवसांपासून जर्मनीने गोव्यात सराव केला. येथील परिस्थितीशी जुळवून घेत आम्ही सर्वाेत्कृष्ट कामगिरी करू, आमचा संघ मजबूत आहे.
ब्राझील-स्पेनकडे लक्ष
कोची : जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाºया ब्राझील-स्पेन या संघांच्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष असेल. ब्राझील हा दक्षिण अमेरिकन चॅम्पियन आहे. तर युरोपियन क्वालिफाइंग विजेता म्हणून स्पेनने मान मिळवला आहे.
नायझेरची विश्वचषकात ‘एन्ट्री’
कोची : नायझेर संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाला आहे. हा संघ प्रतिस्पर्धी संघांना आव्हान देण्यात माहीर असल्याचे मानले जात आहे. ड गटातील उ. कोरियाविरुद्ध नायझेर सज्ज झाला असून आपली एन्ट्री योग्य ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
गिनीविरुद्ध इराणने कसली कंबर
आशियातील दिग्गज संघ म्हणून इराणची ओळख आहे. ‘क’ गटात विजयाने सुरुवात करण्यासाठी हा संघ तयार झाला आहे. गिनीविरुद्ध हा संघ कोणतीही संधी सोडणार नाही. प्रशिक्षक अब्बास चमनयान म्हणाले की, यापूर्वी आमचा संघ गोव्यात खेळलेला आहे. त्याचा फायदा आम्हाला होईल. १६ वर्षांखालील एएफसी चषकात आम्ही दुसºया क्रमांकावर होतो. या कामगिरीच्या बळावर आम्ही विश्वचषकासाठी पात्र ठरलो. खेळाडूंना याची जाण असून ते साजेशी कामगिरी करतील असा विश्वास आहे.