फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल : मैदानावर कुठलाही संघ वर्चस्व गाजवू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:41 AM2017-10-06T03:41:35+5:302017-10-06T11:35:12+5:30
अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होणारा विद्यमान संघ आमच्या वेळेच्या तुलनेत सरस आहे. एआयएफएफच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत त्यांना जे काही शिकायला मिळाले आणि जगभर खेळण्याची संधी मिळाली
अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होणारा विद्यमान संघ आमच्या वेळेच्या तुलनेत सरस आहे. एआयएफएफच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत त्यांना जे काही शिकायला मिळाले आणि जगभर खेळण्याची संधी मिळाली, त्यामुळे त्यांच्या खेळात चांगली सुधारणा झाली आहे.
गेल्या ५-७ वर्षांत खेळण्याच्या शैलीमध्ये मोठा बदल झाला आहे. ज्या बाबी आम्ही १९-२० व्या वर्षी आत्मसात केल्या होत्या त्या बाबी हे खेळाडू १७ व्या वर्षीच शिकलेले आहेत. युरोपमध्ये सामने खेळण्याची मिळालेली संधी आणि प्रशिक्षणामुळे ते प्रतिभावान झाले आहेत. ज्यावेळी मला स्टाबेक एफसीतर्फे खेळण्याची संधी मिळाली होती त्यावेळी मी त्यांना नॉर्वेच्या अंडर-१७ संघाविरुद्ध खेळताना बघितले. मला त्यांच्या लढवय्या वृत्तीने प्रभावित केले. त्यांच्यातील जोश बघण्यासारखा होता. ते मैदानावर सर्वस्व झोकून देण्यास तयार होते. प्रतिस्पर्धी संघ कुठला आहे, याचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम झालेला नव्हता. ते कडवी लढत देत होते. मला संघातील काही खेळाडूंबाबत विचारणा केली जाते, पण माझ्या मते ते संघ म्हणून खेळत असून कुणा एका खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून नाहीत. तरी गोलकिपर धीरज सिंग व प्रभनसुखन गिल यांच्यावर नजर राहील.
लढतीपर्वूी अमेरिकेचे पारडे जड मानले जात आहे, पण मैदानावर उतरल्यानंतर काहीही घडू शकते. भारतीय संघ प्रथमच अंडर-१७ स्पर्धेत खेळत असून सर्वंच खेळाडूंसाठी ही पदार्पणाची स्पर्धा आहे, हे विसरता येणार नाही. मी स्वत:च्या अनुभवावरुन सांगू शकतो की या वयात स्वत:ला कमी लेखण्याचे कुठलेच कारण नाही. जर कुणी भारताविरुद्ध स्वत:ला सरस समजत असेल तर त्याला तसे समजू द्या. आम्ही मयादेशात खेळत असून स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा राहणार आहे. घेतलेल्या मेहनतीच्या परीक्षेची वेळ आली आहे. त्यामुळे मैदानावर खेळ आणि सर्वोत्तम कामगिरी करा. उर्वरित सर्वकाही आपोआप होईल. (टीसीएम)
(लेखक यूएफा युरोप कपमध्ये खेळणारे पहिले भारतीय
फुटबॉलपटू असून भारतीय संघाचे उपकर्णधार आहेत.)