Fifa Worlcup Final: फुटबॉल फायनल पाहणार?, मग राेख लाख रुपये मोजा !
By मनोज गडनीस | Published: December 17, 2022 10:24 AM2022-12-17T10:24:34+5:302022-12-17T10:24:42+5:30
मुंबईत फिफा फिव्हर जोमात, अनेक क्लब, पब्जमध्ये बुकिंग फुल्ल
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फ्रान्स विरुद्ध अर्जेन्टिना या दोन देशांमध्ये फुटबॉल विश्वचषकाचा सामना रविवारी रात्री होत आहे. अर्थात भारतात क्रिकेट इतका फुटबॉल लोकप्रिय नसला तरी, यंदा मात्र मुंबईत फुटबॉल फिव्हर जोमात असल्याचे दिसून येते. मुंबईतील अनेक तारांकित क्लब, पब्ज आणि हॉटेलमध्ये बुकिंग फुल्ल झाले असून, याचे दर एक लाखांपर्यंत पोहोचले आहेत.
लोकांमध्ये वाढती फुटबॉलची क्रेझ पाहता मुंबईतील अनेक हॉटेल्सनी या सामन्याचा प्रेक्षकांना आस्वाद घेता यावा, याकरिता विशेष तयारी सुरू केली आहे. एरवी शुक्रवार-शनिवार अशा विकांती फुल्ल असणाऱ्या क्लब आणि पब्जमध्ये ७० एमएम आकाराच्या महाकाय स्क्रीन्स उभारल्या आहेत. फुटबॉलच्या सामन्याकरिता शनिवारप्रमाणेच रविवारच्या दिवशीही अनेक ठिकाणी कव्हर चार्ज व्यवस्थेनुसार पैशांची आकारणी केली जाणार आहे. काही हॉटेल्सनी खान-पानाचे विशेष पॅकेज तयार केले आहे. काही तारांकित कॅफेंनी तर काही सेलिब्रिटींना पाचारित करून त्यांच्यामार्फत काही (सामनापूर्व) गेम्सचे आयोजन केले आहे. याकरिता भरभक्कम बक्षिसेदेखील देण्यात येणार आहेत. बहुतांश पब्ज व कॅफेमध्ये फ्रान्स आणि अर्जेन्टिना या दोन्ही देशांच्या जर्सीदेखील विक्रीसाठी येथे उपलब्ध केल्या आहेत.
कव्हर चार्ज म्हणजे काय?
शुक्रवार आणि शनिवारी मुंबईतील पब्ज तसेच तारांकित कॅफेमध्ये साधारणपणे एकट्या व्यक्तीला प्रवेश न देण्याचा अलिखित नियम आहे. किमान चारजणांचा ग्रुप असेल तर प्रवेश देण्याचे या चालकांचे धोरण आहे.
मात्र, हा प्रवेश देताना त्या ग्रुपमधील सदस्य संख्येनुसार पॅकेज सुचविले जाते. साधारणपणे किमान १५ हजार रुपये हा पॅकेजचा दर अर्थात कव्हर चार्ज आहे, तर मोठा समूह आणि आलिशान बैठक व्यवस्था याकरिता ७५ हजार रुपयांपर्यंत कव्हर चार्ज आकारला जातो.
जेवढ्या रकमेचा कव्हर चार्ज तुम्ही घेता तेवढ्या रकमेचे खान-पान तुम्हाला या कव्हर चार्जअंतर्गत दिले जाते. फुटबॉलच्या सामन्याकरिता मात्र कव्हर चार्जची रक्कम एक लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
थिएटर्समध्येही प्रक्षेपण
मुंबईतल्या काही मल्टिप्लेक्सनी रविवारचे नियमित सिनेमाचे शो रद्द केले आहेत. त्याऐवजी तिथे फुटबॉल सामन्याचे प्रक्षेपण होणार आहेत, तर शहरातील काही प्रमुख मॉल्समध्ये मोठ्या स्क्रीन्स उभारून ४५० ते ५०० रुपयांपर्यंत तिकीट आकारणी करून सामना प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.
सर्वाधिक बुकिंग वांद्रे व बीकेसीत
वांद्रे व बीकेसी या दोन्ही ठिकाणी किमान ५०पेक्षा जास्त नाइट लाइफची अनुभूती देणारे कॅफे आहेत. वांद्राच्या तुलनेत बीकेसीमधील दर हे नेहेमीच जास्त असतात. फुटबॉलच्या निमित्ताने तेच पाहायला मिळत आहे.
फुटबॉल वर्ल्ड कपमुळे निश्चित हॉटेल उद्योगाला फायदा होईल. हा खेळ एकट्याने पाहण्याऐवजी मित्रांसोबत पाहण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे निश्चितपणे लोक विविध कॅफे, कल्ब, हॉटेल्समधे या सामन्यांचा आनंद घेताना दिसतील. दोन वर्षांच्या कोव्हिड काळानंतर आता परिस्थिती सकारात्मक वाटत आहे.
- विशाल कामत, हॉटेल व्यावसायिक