फिफा विश्वचषक 2017 - मालीला नमवून स्पेन अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 10:47 PM2017-10-25T22:47:23+5:302017-10-25T22:47:40+5:30
बलाढ्य स्पेनने आपल्या तंत्रशुध्द खेळाच्या जोरावर तगड्या मालीचे आक्रमक आव्हान ३-१ असे सहजपणे परतावून लावत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली
रोहित नाईक
नवी मुंबई : बलाढ्य स्पेनने आपल्या तंत्रशुध्द खेळाच्या जोरावर तगड्या मालीचे आक्रमक आव्हान ३-१ असे सहजपणे परतावून लावत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता, शनिवारी २८ आॅक्टोबरला स्पेन विश्वविजेतेपदासाठी बलाढ्य इंग्लंडविरुध्द भिडेल. त्यामुळे यानिमित्ताने फुटबॉलप्रेमींना कोलकाता येथे यूरोपियन तडका अनुभवण्याची संधी मिळेल.
नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात कर्णधार अबेल रुइझ स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने सामन्यात दोन गोल करत संघाला अंतिम फेरी नेले. फेरान टोरेस यानेही एक गोल नोंदवून संघाच्या विजयात हातभार लावला. झुंजार मालीकडून लसाना एनडिएने संघाचा एकमेव गोल साकारला.
वेगवान सुरुवात झालेल्या या सामन्यात मालीने अपेक्षेप्रमाणे आक्रमक पवित्रा घेत स्पेनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्पेनने बचावात्मक पवित्रा घेतल्यानंतर आपली ओळख असलेल्या ‘टिकी टाका’ खेळ करत लहान पासेसच्या जोरावर मालीवर हल्ले केले. १९व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावत कर्णधार अबेलने स्पेनला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर ४३व्या मिनिटाला पुन्हा एकदा अबेलने अप्रतिम चाल रचत शानदार गोल करुन मध्यंतराला स्पेनला २-० असे भक्कम आघाडीवर नेले. दुसºया सत्रात ७१व्या मिनिटाला टोरेसने शानदार गोल करुन स्पेनची आघाडी ३-० अशी भक्कम करत विजय निश्चित केला. यानंतर ७४व्या मिनिटाला एनडीएने गोल करुन मालीचा पहिला गोल साकारला खरा, मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.
मुंबईकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..
युवा फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान असलेल्या नवी मुंबईतील डॉ. डीवाय स्टेडियमवर उपांत्य सामन्यासाठी फुटबॉल चाहत्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. ‘फिफा’ स्वयंसेवकांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार तब्बल ३७,८४७ प्रेक्षकांनी उपस्थित राहून स्पेन विरुध्द माली सामन्याचा आनंद घेतला. तरुणाईचा मोठा वर्ग यावेळी उपस्थित होता आणि त्यांनी मालीला जोरदार पाठिंबा देत त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्पेनने आपल्या लौकिकानुसार बाजी मारत मालीचे स्वप्न धुळीस मिळवले.