FIFA World Cup 2018: 'CR7 म्युझियम'मध्ये 'या' चषकाची उणीव! 

By स्वदेश घाणेकर | Published: July 1, 2018 05:40 AM2018-07-01T05:40:45+5:302018-07-01T05:42:03+5:30

पोर्तुगालच्या दक्षिण-पश्चिम भागात विस्तीर्ण डोंगररांगामध्ये वसलेले मडेरा... डोंगराच्या उतारावर असलेली लहानलहान  घरं आणि पायथ्याला स्पर्श करणारा अटलांटिक महासागर...

FIFA World Cup 2018: 'This' absence of 'Cup' in CR7 Museum! | FIFA World Cup 2018: 'CR7 म्युझियम'मध्ये 'या' चषकाची उणीव! 

FIFA World Cup 2018: 'CR7 म्युझियम'मध्ये 'या' चषकाची उणीव! 

Next

पोर्तुगालच्या दक्षिण-पश्चिम भागात विस्तीर्ण डोंगररांगामध्ये वसलेले मडेरा... डोंगराच्या उतारावर असलेली लहानलहान  घरं आणि पायथ्याला स्पर्श करणारा अटलांटिक महासागर... अशा या मडेराच्या राजधानीत फ्युंसल येथे ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जन्म... अत्यंत बिकट परिस्थितीतून वर आलेला हा खेळाडू म्हणजे फ्युंसलची ओळख... येथेच २०१३ मध्ये पर्यटकांना भुरळ घालणारी वास्तू उभी राहिली आणि ती म्हणजे CR7 म्युझियम... 

पोर्तुगालच्या रोनाल्डोची CR7 म्हणून जगभरात असलेली ओळख त्याच्या चाहत्यांना येथे खेचून आणते. क्लब आणि देशासाठी जिंकलेले अनेक चषक, सन्मानचिन्ह या म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक पर्यटक CR7 म्युझियमला भेट दिल्याशिवाय मडेरा सोडत नाही. 

युरोपातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने चारवेळा सन्मानित करण्यात आलेले गोल्डन बूट पुरस्कार येथे आहेत.  पाच बॅलोन डी पुरस्काराच्या ट्रॉफी येथे आहेत. क्लबकडून जिंकलेली २४ हून अधिक ट्रॉफी आणि २०१६ मध्ये जिंकलेला यूरो कपही येथे आहे. त्याशिवाय रोनाल्डोच्या खडतर प्रवासाची माहिती येथे करून दिली जाते. हे सर्व पाहताना या खेळाडूच्या यशासमोर मडेनाचा तो डोंगरही खुजा वाटतो. त्यामुळे या म्युझियममध्ये आणखी एक चषक असावा अशी मनोमन इच्छा रोनाल्डो आणि त्याचे चाहते करत होते. तो चषक म्हणजे विश्वचषक... 

गेली १५ वर्षे वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा रोनाल्डो चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी रशियात दाखल झाला तो या चषकाचे स्वप्न घेऊनच. कारकिर्दीतील अखेरची विश्वचषक स्पर्धा खेळताना विजयी निरोप घेण्याचा त्याचा निर्धार अर्ध्यावर तुटला. बाद फेरीत माजी विजेत्या उरुग्वेने त्याच्या संघाला २-१ असे पराभूत केले आणि रोनाल्डोसह  त्याच्या चाहत्यांचे निराशा झाली. २००६ मध्ये पोर्तुगाल जेतेपदानजीक पोहोचले होते... पण त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा ते बाद फेरीत माघारी परतले. त्यांच्या या अपयशामुळे CR7 म्युझियममध्ये विश्वचषकाच्या त्या ट्रॉफीचेव उणीव प्रत्येकवेळी जाणवेल. 

Web Title: FIFA World Cup 2018: 'This' absence of 'Cup' in CR7 Museum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.