FIFA World Cup 2018: मनीमाऊ खाणार वाटीतला खाऊ; हळूच सांगणार कोण जिंकणार भाऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 05:07 PM2018-06-07T17:07:27+5:302018-06-07T17:07:27+5:30
तुम्ही जर फुटबॉल विश्वचषकाशी संबंधित कोणती पैज लावणार असाल, तर जरा थांबा. कारण तुम्हाला अचूक निकाल सामन्यापूर्वी समजू शकतो. यामध्ये कुठलीही सट्टेबाजी किंवा फिक्संग अजिबात नाही.
मॉस्को : फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर काही दिवसांत चढायला लागेल. त्यानंतर कोणता देश फुटबॉल विश्वचषक जिंकेल, अशा बऱ्याच जणांमध्ये पैजा लागतील. तुम्ही जर अशीच कोणती पैज लावणार असाल, तर जरा थांबा. कारण तुम्हाला अचूक निकाल सामन्यापूर्वी समजू शकतो. यामध्ये कुठलीही सट्टेबाजी किंवा फिक्सिंग अजिबात नाही. तर यावेळी एक मांजर सामन्यांचा अचूक निकाल सांगणार आहे.
आठ वर्षांपूर्वी, म्हणजेच 2010 साली एक ऑक्टोपस होता, जो सामन्यांचे अचूक निकाल सांगत होता. या विश्वचषकात स्पेन जिंकेल, असे भाकीत या ऑक्टोपसने केले होते, ते खरेही ठरले होते. त्यामुळे त्याला ऑक्टोपस बाबा अशीही उपाधी देण्यात आली होती. पण यावेळी एक पांढरी शुभ्र मांजर रशियामधल्या फुटबॉलच्या सामन्यांचा अचूक निकाल सांगणार आहे.
कोण आहे ही मांजर...
या मांजरीचं नाव आहे अचिलीस. या मांजरीला फुटबॉल सामन्यांचे भाकित वर्तवण्यासाठी हेरिमीटेज संग्रहालयातून बोलावण्यात आलं आहे. या मांजरीला ऐकू येत नाही. पण तरीदेखील ती या सामन्यांचे अचूक निकाल सांगणार आहे. या सामन्यांचे भाकीत वर्तवण्यासाठी अचिलीसला खास डाईटही देण्यात येणार आहे.
अचिलीस कसे वर्तवणार भाकीत...
सामन्यापूर्वी अचिलीससमोर दोन देशांचे झेंडे ठेवले जाणार आहेत. या दोन झेंड्यापुढे दोन वाट्या ठेवल्या जातील. या दोन्ही वाट्यांमध्ये अचिलीससाठी खाऊ ठेवला जाईल. अचिलीस ज्या झेंड्याच्या बाजूला असलेल्या वाटीतला खाऊ उचलेल तो देश विजयी ठरेल.