FIFA World Cup 2018 : वयोवृध्द चॅटर्जी दाम्पत्याची ही दहावी विश्वचषक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 09:46 PM2018-06-14T21:46:31+5:302018-06-14T21:46:31+5:30

फुटबॉलवेडे दाम्पत्य आहे आपल्या कोलकात्याचे पन्नालाल आणि चैताली चॅटर्जी.

FIFA World Cup 2018: Chatterjee couple attending 10th World Cup tournament | FIFA World Cup 2018 : वयोवृध्द चॅटर्जी दाम्पत्याची ही दहावी विश्वचषक स्पर्धा

FIFA World Cup 2018 : वयोवृध्द चॅटर्जी दाम्पत्याची ही दहावी विश्वचषक स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्दे१९८२ पासून प्रत्येक स्पर्धेला हजेरी

ललित झांबरे

बंगाली माणूस मासे आणि फुटबॉल या दोन गोष्टींचा दर्दी असल्याचे जगप्रसिध्द आहे पण कुणी मध्यमवर्गीय सेवानिवृत्त  पोटाला चिमटा काढून पै-पै वाचवत एक- दोन नाही तर तब्बल १० विश्वचषक स्पर्धांना हजेरी लावत असेल तर त्यांना दर्दी नाही, फुटबॉलवेडेच म्हणावे लागेल. असे फुटबॉलवेडे दाम्पत्य आहे आपल्या कोलकात्याचे पन्नालाल आणि चैताली चॅटर्जी . 1982 पासून न चुकता हे दाम्पत्य प्रत्येक विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला हजेरी लावत आहे. रशिया 2018 ही त्यांची सलग दहावी विश्वचषक स्पर्धा आहे.

असे नाही की या चॅटर्जी दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली आहे. तुमच्या आमच्यासारखेच ते  सहजपणे हॉटेलात जाऊन पार्टी करू शकत नाहीत की  चांगल्या चांगल्या पर्यटन स्थळी हिंडण्याफिरण्याची मौजमजा करू शकत नाहीत, पण आपल्या जेमतेम आर्थिक स्थितीतूनही फुटबॉल प्रेमापोटी काटकसरीने ते नेहमी काही पैसे बाजूला ठेवत असतात. अशी जमवाजमव करुन ते आता रशियातसुध्दा पोहचले आहेत.

हा प्रवास कसा सुरू झाला याच्या आठवणी सांगताना चैताली म्हणतात की, निव्वळ योगायोगाने हे घडून आले.

पन्नालाल चॅटर्जी यांचे एक घनिष्ठ मित्र १९८२ च्या सुमारास इंग्लंडमधील ससेक्स प्रांताचे मेयर बनणार होते. या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांनी सर्व मित्रांना इंग्लंडमध्ये आमंत्रित केले होते म्हणून चॅटर्जी दाम्पत्य तिकडे गेले. त्याचवेळी स्पेनमध्ये विश्वचषक फुटबॉलचे सामने सुरू होते आणि हे आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी विश्वचषक फुटबॉलचे सामने बघण्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कोणतीच असू शकत नाही यावर एकमत झाले आणि अशाप्रकारे पन्नालाल आणि चैताली चॅटर्जी या दाम्पत्याने पहिल्यांदा १९८२ मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला हजेरी लावली.

याप्रकारे कोणतेही नियोजन नसताना स्टेडियममध्ये पोहोचल्यावर चॅटर्जी दाम्पत्याला विश्वचषक फुटबॉलची अशी काही भूरळ पडली की तेंव्हापासूनची एकही विश्वचषक स्पर्धा त्यांनी चुकवलेली नाही. मात्र यासाठी त्यांना काटकसर करत बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागला. खिशाचे बजेट सांभाळता सांभाळता भरपूर तडजोडी कराव्या लागल्या.

या सर्व प्रवासातला आपला सर्वात स्मरणीय क्षण कोणता असे विचारता चैताली सांगतात  दिएगो मॅराडोनाच्या 1986 च्या वर्ल्ड कपमधील खेळाला तोड नव्हती. ज्या शिताफीने ही बटूमूर्ती चेंडू काढायची आणि डिफेंडर्स हतबल होऊन बघत रहायचे ते बघण्यासारखे होते. आणि अंतिम सामन्यातला त्याचा तो हँड अॉफ गॉड गोल....त्यापेक्षा चांगली स्मरणात राहणारी दुसरी कोणती गोष्ट असू शकते. मॅराडोना हा आवडता खेळाडू असला तरी संघ म्हणून ते ब्राझीलचे चाहते आहेत. त्याचप्रमाणे मोहन बगानच्या त्या कट्टर चाहत्या आहेत.

टीव्हीवर सामने घरबसल्या बघण्याची सोय असताना स्टेडियममध्येच कशाला बघायचे, यावर चैताली सांगतात की टेलिव्हिजनवर तुम्हाला फोकस सर्व फुटबॉलवर झालेला दिसतो पण मैदानात त्या बॉलच्या पलीकडेही भरपूर काही होत असते. ते बघण्याची आणि अनुभवण्याची मजा स्टेडियममध्येच आहे.

आता पन्नालाल ८५ वर्षाचे आहेत. आणि चैताली ७५ वर्षांच्या.त्यामुळे रशिया २०१८ ही आपली शेवटची स्पर्धा असेल. पुढच्यावेळी कतारला कदाचित आम्ही हजर राहू शकणार नाहीत असे ते अतिशय भावूक होऊन सांगतात. यावेळी २८ जूनपर्यंत रशियात थांबण्याचे नियोजन त्यांनी केलेले आहे. यावेळी तीनच सामन्यांची तिकिटे त्यांच्याकडे आहेत आणि बाद फेरीच्या सामन्यांची तिकिटे त्यांना मिळू शकलेली नाहीत. रशियन दुतावास आणि विश्वचषक आयोजन समितीने आपल्याला आणखी काही सामन्यांची तिकिटे उपलब्ध करुन द्यावीत अशी विनंती त्यांनी केली आहे मात्र अद्याप तरी ती मान्य झालेली नाही.

Web Title: FIFA World Cup 2018: Chatterjee couple attending 10th World Cup tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.