FIFA World Cup 2018 : फुटबॉल विश्वचषकाचा इतिहास मांडला अंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 07:29 PM2018-06-15T19:29:32+5:302018-06-15T19:30:01+5:30

गोमंतकीय लोक हे फुटबॉल वेडे असल्याची प्रचीती वेळोवेळी आली आहे. त्यात फुटबॉलचा विश्वचषक म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. पोर्तुगाल किंवा ब्राझीलचा संघ तर गोवेकरांसाठी सर्वात जास्त प्रिय. त्यामुळे याच संघांनी विश्वचषकावर आपले नाव कोरावे, असे प्रत्येक गोमंतकीयाला वाटते.

FIFA World Cup 2018: In the courtyard of the history of football World Cup; Chodankar's unique football love in Mapusa | FIFA World Cup 2018 : फुटबॉल विश्वचषकाचा इतिहास मांडला अंगणात

FIFA World Cup 2018 : फुटबॉल विश्वचषकाचा इतिहास मांडला अंगणात

Next

-  प्रसाद म्हांबरे

म्हापसा : गोमंतकीय लोक हे फुटबॉल वेडे असल्याची प्रचीती वेळोवेळी आली आहे. त्यात फुटबॉलचा विश्वचषक म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. पोर्तुगाल किंवा ब्राझीलचा संघ तर गोवेकरांसाठी सर्वात जास्त प्रिय. त्यामुळे याच संघांनी विश्वचषकावर आपले नाव कोरावे, असे प्रत्येक गोमंतकीयाला वाटते. असेच एक फुटबॉल वेडे म्हणजे म्हापशातील प्रदीप चोडणकर. जागतिक फुटबॉलचा पूर्ण इतिहास त्यांनी आपल्या अंगणात प्रदर्शनाद्वारे लोकांसाठी मांडलेला आहे.
गोव्यातील एक फुटबॉलप्रेमी, खेळाडू तसेच प्रशिक्षक प्रदीप चोडणकर यांनी फुटबॉल चषकाची पूर्ण माहिती गोवेकरांसाठी एकाच छताखाली उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या विश्वचषकापासून ते २०१४ सालच्या चषकापर्यंतची सगळी माहिती त्यांनी भरवलेल्या प्रदर्शनातून मांडली आहे. फीफा चषकाची प्रतिमा तर औत्सुक्याचा विषय बनली आहे. ते राहात असलेला म्हापसा-गावसावाडो परिसर सध्या फुटबॉलमय झालेला पाहायला मिळत आहे. यंदाच्या स्पर्धेत खेळत असलेल्या संघांचे ध्वज रस्त्यावरून ते चोडणकर यांच्या घरापर्यंत दिसून येतात. तसेच काही नामवंत फुटबॉलपटूंचे पोस्टर त्यांच्या अंगणात लावण्यात आलेले आहेत. त्यात भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे.
यंदाच्या स्पर्धेतील संघ, त्यांचे गट, प्रत्येक संघातील महत्त्वाचा खेळाडू, प्रशिक्षक, सामन्याचे अधिकारी, त्यांचे साहाय्यक यांची नावे तसेच पूर्ण स्पर्धेची विस्तारीत माहिती येथे लावण्यात आलेली आहे. रशियात होणारी ही स्पर्धा कुठल्या मैदानावर होतील, याची देखील माहिती आणि छायाचित्रे आपल्या पाहायला मिळतात. जागतिक फुटबॉल स्पर्धेचा इतिहास सांगणारे विशेष पोस्टर लावण्यात आले आहे. त्यात फीफा काँग्रेसची जागतिक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यासाठी अ‍ॅमस्टरडॅम येथे २८ मे १९२८ रोजी झालेली पहिली बैठक व त्यानंतरचा इतिहास याची माहिती देण्यात आली आहे. तसेच स्पर्धा जिंकलेल्या प्रत्येक संघाची नावे व त्यांचो फोटो सुद्धा लावले आहेत.
१९३० सालच्या पहिल्या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या जोस नासाझ्झी
यांच्या फोटोसह त्यानंतर झालेल्या इतर २० स्पर्धेतील गोल्ड फुटबॉल विजेता व २०१४ सालच्या स्पर्धेतील विजेता लिओनेल मेस्सीचा
फोटो प्रदर्शनात मांडलेला आहे.
प्रत्येक स्पर्धेत वापरण्यात आलेले फुटबॉल व यंदाच्या स्पर्धेतील फुटबॉल सुद्धा मांडण्यात आला आहे. फीफाचे १०० उत्कृष्ट खेळाडू यांचे वेगळे पोस्टर सुद्धा लावले आहे. त्यात थिएरी हेन्री, सर्जियो रामोस, नेमार, रोनाल्डिनो, गॅब्रियल बाप्तिस्ता यांचा समावेश आहे.

चोडणकर यांच्याविषयी....
प्रदीप चोडणकर हे मागील १६ वर्षांपासून प्रत्येक जागतिक स्पर्धेवेळी हे प्रदर्शन भरवतात. यंदाचे हे
पाचवे वर्ष. शिवोली येथील सेंट फ्रान्सिस झेवियर हायस्कुलात ३३ वर्षे शारीरिक शिक्षक म्हणून त्यांनी काम केल्यानंतर निवृत्त झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूलाने राज्यस्तरावर तीन स्पर्धा जिंकल्या. तर दोन स्पर्धांत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गोवा फुटबॉल मंडळाचे सदस्य असलेल्या चोडणकर यांनी १९७४-७५ साली म्हापशातील प्रसिद्ध लक्ष्मी प्रसाद स्पोर्ट्स क्लबच्या संघासोबत प्रथम विभागीय लीग स्पर्धेत सुद्धा भाग घेतला आहे.



गोमंतकीयांना फुटबॉलज्वर
संपूर्ण जग फुटबॉलमय झालेले असताना गोमंतकीय कसे काय मागे राहू शकतील? गोमंतकीय आपल्या आवडत्या संघाला, खेळाडूंना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवताना दिसून येत आहेत. भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी आपल्या कारला ब्राझीलच्या ध्वजाचा रंग दिलाय. याबाबत बोलताना ते म्हणाले, की मी माझ्या आवडत्या संघाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी ही शक्कल लढवली आहे. मी आशा करतो की यंदा विश्वचषक ब्राझीलच जिंकेल. दक्षिण गोव्यातील फँ्रकी फर्नांडिस यांनी विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या ३२ देशांचे ध्वज आपल्या घरात लावले आहे. शिवाय त्यांनी आपल्या परसातील नारळाच्या झाडाला व घरातील फुलांच्या कुंड्यांना अर्जंेटिनाच्या ध्वजाच्या रंगाने रंगवले आहे. ते म्हणाले, मी फ्रान्स आणि अर्जंेटिना संघांचा चाहता आहे. बाणावलीच्या कॅनंट फर्नांडिसने आपल्या आवडत्या नेमारचे ११ फुटांचे पोस्टर घराच्या भिंतीवर लावले आहे. कॅनंट फुटबॉलपटू असून तो युनायटेड क्लब बाणावली संघाचा खेळाडू आहे. तर अंजुणाचा अक्बर्ट फर्नांडिस इंग्लंड संघाचा चाहता आहे. त्याने आपल्या बेडरूमला इंग्लंडच्या ध्वजाचा लाल आणि पांढरा रंग दिला आहे. त्याच्याजवळ मँचेस्टर युनायटेडच्या ७0 जर्सी आहेत आणि तो फिफा विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडच्या संघाची जर्सी मिळवण्याच्या तयारीत आहे. अशा प्रकारचे अनेक फुटबॉलप्रेमी आपापल्या परीने या खेळावरील प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहेत.

Web Title: FIFA World Cup 2018: In the courtyard of the history of football World Cup; Chodankar's unique football love in Mapusa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.