FIFA World Cup 2018 : फिफा चॅम्पियन होणार क्रिकेटपेक्षा आठपट मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:35 AM2018-06-08T01:35:54+5:302018-06-08T01:35:54+5:30
अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या फिफा विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना स्पर्धेचा झळाळता सोनेरी चषक कोण पटकावणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे.
नवी दिल्ली : अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या फिफा विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना स्पर्धेचा झळाळता सोनेरी चषक कोण पटकावणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. कोणता संघ कसा आणि किती बलाढ्य आहे, कोणत्या संघाच्या काय उणिवा आहेत... अशा अनेक गोष्टींच्या चर्चांना उधाण आले आहे. या सर्वांमध्ये स्पर्धेच्या एकूण बक्षीस रकमेवरही मोठी चर्चा होत असून फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील बक्षीस रकमेची क्रिकेट विश्वचषकासह तुलना केली, तर या दोन्ही स्पर्धेतील फरक खूप मोठा असल्याचे दिसून येते. तब्बल ८० पटींनी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची बक्षीस रक्कम क्रिकेटच्या तुलनेत मोठी आहे. त्याचबरोबर ‘फिफा विश्वचषक चॅम्पियन’ संघाला यंदा १८ कॅरेट सोन्याच्या चकाकत्या चषकासोबतच २२५ कोटींचा रोख पुरस्कार मिळणार आहे. बसली ना ‘किक’..!
विश्वचषकाला रशियात १४ जूनपासून सुरुवात होत आहे. १५ जुलैपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात ३२ संघ जेतेपदासाठी चढाओढ करतील तेव्हा खेळाडूंवर पुरस्कारांचा अक्षरश: वर्षाव होणार आहे. २०१८च्या फिफा विश्वचषकातील पुरस्कारांची एकूण रक्कम ७९
कोटी १० लाख डॉलर (५३ अब्ज रुपयांहून अधिक) इतकी असेल. २०१४ला ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या तुलनेत ही रक्कम ४० पट जास्त आहे.
जगभरात फुटबॉलची धूम असली, तरी भारतात मात्र क्रिकेटचे वेड काहीही झाले तरी कमी होत नाही. सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये मिळणारे रोख पारितोषिक पाहूनच भारतीयांचे डोळे दीपून जातात. अशात जर का फुटबॉल विश्वचषकाच्या रोख पारितोषिकासोबत तुलना झाली, तर क्रिकेट विश्वचषक या जागतिक खेळापुढे खूप लहान असल्याचे जाणवेल. क्रिकेटशी तुलना केल्यास फुटबॉल विश्वचषकाची पुरस्कार रक्कम आठपट अधिक आहे.
आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली
झालेल्या २०१५च्या आयसीसी विश्वचषकातील एकूण बक्षीस रक्कम ६८ कोटी ५३ लाख रुपये होती. यामध्ये विजेत्या संघाला ३९ लाख ७५ हजार डॉलर आणि उपविजेत्याला १७ लाख ५० हजार डॉलर मिळाले होते. गटात पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी दोन
लाख दहा हजार डॉलर देण्यात
आले. (वृत्तसंस्था)
क्लबस्नाही मिळतील पैसे
फिफाच्या आकडेवारीनुसार, विश्वचषकातील एकूण बक्षीस रकमेपैकी ४० कोटी डॉलर संघांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे विभागून देण्यात येतील. याशिवाय ३९ कोटी १० लाख डॉलर खेळाडूंच्या क्लबस्ना विविध योजनेंतर्गत दिले जातील.
मॉस्कोच्या लुझनिकी स्टेडियममध्ये १५ जुलै रोजी जो संघ विश्वचषक जिंकेल त्याला ३ कोटी ८० लाख डॉलर अर्थात २२५ कोटींचा पुरस्कार मिळणार आहे. मागच्या तुलनेत ही रक्कम ३० लाख डॉलर अधिक आहे.
उपविजेत्या संघाला १९४.४ कोटी रुपये
स्पर्धेतील उपविजेत्याला पुरस्कारादाखल १९४.४ कोटी रुपये मिळतील. तिसºया स्थानावरील संघाला १६०.१ कोटींचा पुरस्कार दिला जाईल. फिफाच्या क्लब लाभार्थी योजनेंतर्गत ज्यांनी विश्वचषकात सहभागी होण्यासाठी खेळाडूंना मोकळे केले त्या क्लबस्ना २० कोटी ९ लाख डॉलर दिले जातील. विश्वचषकादरम्यान खेळाडू जखमी होऊन काही नुकसान झाल्यास भरपाई म्हणून १३ कोटी ४० लाख डॉलरची रक्कम क्लब सुरक्षा कार्यक्रमाला दिली जाईल.
सर्वच संघांवर होणार बक्षिसांचा वर्षाव...
विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाºया सर्वच ३२ संघांवर रोख पारितोषिकांचा वर्षाव होईल. यामध्ये तयारीसाठी प्रत्येकाला १५-१५ लाख डॉलर मिळतील. स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडणाºया प्रत्येक संघाला ८० लाख डॉलर, तर अंतिम १६ मधून बाहेर पडणाºया संघांना प्रत्येकी १ कोटी २० लाख डॉलरची रक्कम मिळेल. उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होणाºया संघाना १ कोटी ६० लाख आणि चौथ्या स्थानी राहणाºया संघाला २ कोटी २० लाख डॉलरचे बक्षीस प्रदान करण्यात येईल.
रशिया रचणार विक्रम
सर्वांत मोठ्या बक्षीस रकमेचा विश्वचषक म्हणून यजमान रशिया विश्वविक्रम रचेल. ब्राझील येथे झालेल्या विश्वचषकाची बक्षीस रक्कम ५७६ मिलियन डॉलर होती, तर २०१०मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकाची बक्षीस रक्कम ४२० मिलियन डॉलर होती. यानंतर जर्मनी (२००६ : २६६ मिलियन डॉलर), द. कोरिया - जपान (२००२ : १५६.६ मिलियन), फ्रान्स (१९९८ : १०३ मिलियन), अमेरिका (१९९४ : ७१ मिलियन), इटली (१९९४ : ५४ मिलियन), मॅक्सिको (१९८६ : २६ मिलियन) या देशांचा क्रमांक लागतो.