Fifa World Cup 2018: फ्रान्सने जिंकले ₹ 2,60,73,70,000 चे बक्षीस; सगळेच संघ मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 10:32 AM2018-07-17T10:32:45+5:302018-07-17T10:35:19+5:30
फ्रान्सने 20 वर्षांनंतर फिफा विश्वचषक स्पर्धा जिंकली.या चषकासह फ्रान्सने 2,60,73,70,000 ही रक्कम बक्षीस रूपात कमावली. याआधी झालेल्या विश्वचषक स्पर्धांच्या तुलनेत विजेत्या संघाने जिंकलेली ही सर्वाधिक रक्कम आहे
मॉस्को - फ्रान्सने 20 वर्षांनंतर फिफा विश्वचषक स्पर्धा जिंकली. मॉस्कोच्या लुझनियाकी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सने 4-2 अशा फरकाने क्रोएशियाला नमवले आणि 1998 नंतर फ्रान्सने जेतेपदाचा चषक उंचावला. या चषकासह फ्रान्सने 2,60,73,70,000 ही रक्कम बक्षीस रूपात कमावली. याआधी झालेल्या विश्वचषक स्पर्धांच्या तुलनेत विजेत्या संघाने जिंकलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. केवळ फ्रान्सच नव्हे तर रशियातील विश्वचषकाने खेळाडूंसह अन्य संघांनाही मालामाल केले आहे. 2014च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा खर्च 40 टक्क्यांनी वाढला आहे.
कोलकाता येथे 2017 मध्ये झालेल्या फिफा सदस्यांच्या बैठकीत रशियातील विश्वचषक स्पर्धेसाठी 791 मिलियन डॉलर म्हणजेच 54,25,07,35,000 रूपयांचा बजेट असल्याचे सांगितले होते. त्यातील 400 मिलियन ( 27,43,40,00,000 रूपये ) रक्कम ही बक्षीसावर खर्च केले जाणार हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. 2014च्या विश्वचषक स्पर्धेपेक्षा ही रक्कम 12 टक्के अधिक आहे. चषकाची किंमतच 1,37,17,00,000 रूपये आहे.
फ्रान्सने जेतेपद पटकावून 2,60,73,70,000 एवढी बक्षीस रक्कम आपल्या नावे केली, तर क्रोएशियाच्या खात्यात 1,92,03,80,000 रक्कम जमा झाली आहे. तिस-या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांनी अनुक्रमे 1,64,65,20,000 व 1,50,93,10,000 रक्कम कमावले. पाच ते आठ स्थानावरील संघांना प्रत्येकी 1,09,76,80,000 इतके, तर 9 ते 16 व्या स्थानावरील संघांना प्रत्येकी 82,32,60,000 एवढी बक्षीस रक्कम देण्यात आली.