FIFA World CUP 2018: ...तर केन होणार नेमारपेक्षाही श्रीमंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 08:06 AM2018-07-09T08:06:47+5:302018-07-09T08:09:48+5:30
‘गोल्डन बॉय’ला मोठ्या ऑफर्स
सचिन कोरडे : फुटबॉल संस्कृती असलेल्या देशात फुटबॉलपटूंची चांदी आहे. ते चिक्कार पैसा कमावतात आणि म्हणून त्यांची लाईफस्टाईलही चंदेरी असते. सध्या जगात सर्वात महागडा खेळाडू म्हणून ब्राझीलचा नेमार आघाडीवर आहे. फ्रान्सच्या पीएसजी (पॅरीस सेंट जेमेन) या संघाकडून तो खेळतो. यासाठी पीएसजीने नेमारसोबत १९८ मिलियन पांउडचा करार केला. बार्सेलोना संघाकडून तो पीएसजीकडे गेला. एखाद्या फुटबॉलपटूसाठी असलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. हा एक विक्रमच म्हणता येईल.
आता नेमारची जागा इंग्लंडचा हॅरी केनला मिळण्याची शक्यता आहे. पीएसजी आणि रिअल माद्रीद या दोघांच्याही नजरा केनवर आहेत. कारण सध्या सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात गोल्डन बुटाचा प्रबळ दावेदार म्हणून केन सर्वात पुढे आहे. त्याने सहा गोल नोंदवले असून त्याच्या खेळाने संपूर्ण फुटबॉल विश्व प्रभावित झाले आहे. त्यामुळे त्याचा भाव वधारला आहे. केनचा सध्याचा फॉर्म आणि त्याच्यातील कौशल्य बघता हे दोन्ही संघ त्याच्याशी करारही करतील. केन सध्या टोटनहॅम संघाकडून खेळत आहे. पण त्याच्या या करारात तशा कुठल्याही अटी नाहीत. विश्वचषकापूर्वीच त्याने आपला करार केला होता. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या संघात जाण्यासाठी त्याच्यावरील बोली वाढणार हे नक्की. पीएजीने केनबाबत अधिक उत्सुकता दाखवली तर त्यांना केनसाठी १९८ मिलियन पाउंडपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागेल. पीएजीशिवाय रिअल माद्रीदने तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे या दोघांच्या बोलीत केन मात्र धनाढ्य होणार!