FIFA World Cup 2018: इंग्लंडचे खेळाडू वापरणार ' हॉट पँट्स '
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 18:24 IST2018-06-18T18:24:19+5:302018-06-18T18:24:19+5:30
तंत्रज्ञान हे फक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंचे व्हीडीओ पाहून अभ्यास करण्यापर्यंत मर्यादीत राहिलेले नाही, तर इंग्लंडने यापुढे जाऊन खेळाडूंच्या मदतीसाठी एक खास गोष्टी बनवली आहे आणि ती म्हणजे ' हॉट पँट्स ' .

FIFA World Cup 2018: इंग्लंडचे खेळाडू वापरणार ' हॉट पँट्स '
सोची : प्रत्येक देशाचं विश्वचषक जिंकणं, हे स्वप्न असतंच. त्यासाठी ते जीवापाड मेहनत घेत असतात. पण खेळाडूंच्या मेहनतीला जर तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर खेळ अधिक चांगला होऊ शकतो. तंत्रज्ञान हे फक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंचे व्हीडीओ पाहून अभ्यास करण्यापर्यंत मर्यादीत राहिलेले नाही, तर इंग्लंडने यापुढे जाऊन खेळाडूंच्या मदतीसाठी एक खास गोष्टी बनवली आहे आणि ती म्हणजे ' हॉट पँट्स ' . ही ' हॉट पँट्स ' म्हणजे आहे तरी काय आणि ती बनवली कशासाठी, या गोष्टी जाणून घ्या.
दुखापती या खेळाडूंना पाचवीलाच पुजलेल्या असतात. फुटबॉलसारख्या खेळात तर कधी दुखापत होईल हे सांगता येऊ शकत नाही. त्यामध्ये रशियामधलं वातावरण हे थंड असल्यामुळे दुखापत लवकर बरी होऊ शकणार नाही. त्यामुळेच इंग्लंडच्या संघाने यावेळी ' हॉट पँट्स ' बनवल्या आहेत. या ' हॉट पँट्स ' मुळे पायाच्या स्नायूला दुखापतीची झळ कमी बसू शकते. त्याचबरोबर रशियामधल्या थंड वातावरणात खेळाडूना या ' हॉट पँट्स ' मधून उब मिळत राहणार आहे.
पहिल्यांदा या ' हॉट पँट्स ' 2012 साली बनवल्या गेल्या होत्या. या ' हॉट पँट्स ' बनवण्यासाठी प्रत्येकी दोनशे युरो एवढी किंमत मोजावी लागणार आहे. सध्याच्या घडीला इंग्लंडचा संघ 12 अंश तापमानामध्ये सराव करत आहे. त्यामुळे त्यांना या ' हॉट पँट्स ' चा चांगलाच फायदा होत आहे. इंग्लंडचा विश्वचषकातील पहिला सामना सोमवारी ट्युनिशियाबरोबर होणार आहे.