FIFA World Cup 2018: गट साखळीनंतर कोण कसे जाणार पुढे?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 02:53 PM2018-06-23T14:53:48+5:302018-06-23T14:58:04+5:30
कमावलेले गुण, केलेले गोल, भक्कम बचाव आणि चांगले वर्तन महत्त्वाचे ठरणार
- ललित झांबरे
विश्वचषक फुटबॉलचा ज्वर आता जगभर पसरला आहे. दुसऱ्या टप्प्याचे संघ आता स्पष्ट होऊ लागले आहेत. आतापर्यंत यजमान रशियासह ऊरूग्वे, फ्रान्स आणि क्रोएशियाने बाद फेरीतील म्हणजे अंतिम 16 मधील आपले स्थान पक्के केले आहे. तर सौदी अरेबिया, इजिप्त, मोराक्को, पेरू आणि कोस्टा रिकाचे आव्हान गटवार साखळीतच संपले आहे. इतर संघामधून माजी विजेत्या अर्जेंटिना व जर्मनीच्या संघाची अवस्था खराब आहे. अर्जेंटिनाच्या सर्व आशा आता नायजेरिया विरुद्धच्या सामन्यावर आहेत. हा सामना त्यांना जिंकावाच लागणार आहे. मात्र तेवढ्याने भागणार नाही तर क्रोएशियाने आईसलँडला हरवावे, अशीही प्रार्थना त्यांना करावी लागणार आहे. जर्मनीला मेक्सिकोकडून पराभवाच्या धक्क्यातून सावरत पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
असे 'हे झाले तर ते होईल आणि ते झाले तर हे होईल', अशी समीकरणे आता मांडली जात आहेत. अशा स्थितीत गटवार सामन्यांमध्ये दोन-तीन संघांचे सारखेच गुण झाले तर....कोण पुढे जाईल? ही कोंडी कशी फोडणार? यासाठीची फिफाची टायब्रेकर नियमावली महत्त्वाची ठरणार आहे.
फिफाच्या टाय-ब्रेकर नियमावलीनुसार गटात दोन किंवा अधिक संघांचे सारखेच गुण असतील तर ....(विजयासाठी 3 गुण आणि बरोबरीसाठी उभय संघांना प्रत्येकी एक गुण मिळतो) ...
1) ज्या संघाकडे सर्वाधीक गुण आहेत तो पुढे जाईल.
2) गुणसुध्दा सारखेच असले तर सर्व साखळी सामन्यांअखेर ज्यांच्या गोलांचा फरक ( स्वतः केलेले वजा स्वतःवर झालेले) जास्त असेल तो संघ..
3) गुण आणि गोल फरकानेही कोंडी फुटत नसेल तर ज्या संघाने साखळी सामन्यांमध्ये अधिक गोल केलेले असतील तो...संघ पुढे जाईल.
एवढ्या निकषानंतरही निर्णय होऊ शकत नसेल तर ..
4) संबंधित संघांदरम्यानच्या साखळी सामन्यात ज्या संघाने जास्त गुण कमावले असतील तो...
5) संबंधित संघांदरम्यानच्या साखळी सामन्यात ज्याचा गोलफरक सरस असेल तो...
6) संबंधित संघांदरम्यानच्या साखळी सामन्यात ज्याने अधिक गोल केलेले असतील तो...
7) आणि यानंतरही कोंडी कायम राहिली तर ज्या संघाला कमीतकमी दंड किंवा शिक्षा झाली (पिवळे आणि लाल कार्ड) असेल तो संघ पुढे जाईल. यासाठी प्रत्येक पिवळ्या कार्डासाठी 1 गूण, एकाच खेळाडूला दोन पिवळ्या कार्डासाठी 3 गुण, थेट लाल कार्डासाठी 4 गुण, पिवळे कार्ड आणि त्यानंतर थेट लाल कार्ड यासाठी 5 गुण वजा (उणे) पकडण्यात येणार आहेत.
एवढ्या सगळ्या खटाटोपानंतरही निर्णय होऊ शकत नसेल तर मात्र लॉटरीने निर्णय घेण्यात येणार आहे.
(लेखक क्रीडा पत्रकार आहेत.)