FIFA World Cup 2018 : जबरा फॅन, संघाच्या समर्थनासाठी ५१४५ किलोमीटर, ७५ दिवसांचा त्याचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 07:51 AM2018-06-14T07:51:14+5:302018-06-14T07:51:14+5:30
विश्वचषक २०१८ च्या सलामी सामन्यात यजमान रशियाला त्यांच्या घरच्या मैदानावर नमविण्याच्या जिद्दीने सौदी अरेबियाचा संघ मैदानात उतरेल तेंव्हा स्टँडस्मध्ये एक चेहरा हमखास दिसेल.
विश्वचषक २०१८ च्या सलामी सामन्यात यजमान रशियाला त्यांच्या घरच्या मैदानावर नमविण्याच्या जिद्दीने सौदी अरेबियाचा संघ मैदानात उतरेल तेंव्हा स्टँडस्मध्ये एक चेहरा हमखास दिसेल. तो असेल फहद् अल् याह्या याचा. हजारो प्रेक्षकांमध्ये याच एकाच विशेष उल्लेख करायचा तो यासाठी की हा फहद् हा सौदी संघाचा काही साधासुधा फॅन नाही तर जबरा फॅन आहे.
आपल्या संघाला समर्थन देण्यासाठी तो थोडथोडका नाही तर ५,१४५ किलोमीटरचा प्रवास करून रशियात आलाय आणि तेसुद्धा विमानाने नाही तर सायकलीने...होय! चक्क सायकलीने तो चार देशांच्या सीमा पार करत सौदीतून रशियात मॉस्कोला आलाय.
या प्रवासासाठी त्याला ७५ दिवस लागले. यादरम्यान त्याचा एका ट्रकसोबत किरकोळ अपघातसुद्धा झाला. त्यात त्याच्ळा डोक्याला आणि पाठीला किरकोळ मारसुद्धा लागला पण फहद्ने परतीची वाट न धरता नेटाने मार्गक्रमण सुरुच ठेवले.
या धाङसाबद्दल हा २८ वर्षीय फुटबॉलवेडा सांगतो, ‘रियाध प्रांताचे राजकुमार फैझल अब्दुलअझीझ यांनी माझ्याकडे राष्टध्वज सोपवला आणि तो मी इथपर्यंत घेऊन आलोय. आमच्या संघाला समर्थंन देण्यासाठी मी एवढ्या लांबवर आलोय. त्याने आपल्या संघाचे रशियात तळ असणाया सेंट पिटर्सबर्ग येथे संघाची भेटसुद्धा घेतली आणि तेथे त्याच्या निर्धाराचे कौतुक करत सौदी अरबियन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष अदेल एझ्झाट यांनी त्याचे स्वागत केले.
आता इकडून परतीचा प्रवासही सायकलीनेच का? या प्रश्नाच्या उत्तरात हसत हसत फहद् म्हणाला की, नाही, आता परतताना मात्र विमानाने रियाधला जाईन. फहद् परतताना भलेही विमानाने जावो, पण त्याच्या या फुटबॉलप्रेमाला आणि त्या प्रेमापोटी केलेल्या सायकलवारीला तोड नाही हे मात्र खरे!