FIFA World Cup 2018 : किती किलो सोन्याने तयार केली आहे फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी? वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 04:35 PM2018-06-07T16:35:02+5:302018-06-07T16:40:35+5:30
वेगवेगळ्या गोष्टींसह नेहमीप्रमाणे फुटबॉलच्या ट्रॉफीची चर्चा यावेळी रंगली आहे. या ट्रॉफीचं नेहमीच सर्वांना आकर्षण असतं. कारण ही ट्रॉफी पूर्णपणे सोन्याने बनवण्यात आली आहे.
मुंबई : फिफा वर्ल्ड कप 2018 ला काही दिवसातच मॉस्कोमध्ये सुरुवात होणार आहे. जगभरातील 32 दमदार संघ 14 जूनपासून विश्वविजेता होण्यासाठी पूर्ण अनुभव पणाला लावणार आहे. वेगवेगळ्या गोष्टींसह नेहमीप्रमाणे फुटबॉलच्या ट्रॉफीची चर्चा यावेळी रंगली आहे. या ट्रॉफीचं नेहमीच सर्वांना आकर्षण असतं. कारण ही ट्रॉफी पूर्णपणे सोन्याने बनवण्यात आली आहे.
कधीपासून रंगणार महामेळा?
फिफा वर्ल्ड कप 2018 चं उदघाटन रशिया आणि सौदी अरब यांच्यातील सामन्याने होणार आहे. 14 जूनपासून सुरु होणाऱ्या या फुटबॉलच्या महाकुंभमेळ्याचं फायनल 15 जुलैला खेळलं जाणार आहे. पण आत्ताच या सोन्याच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे सांगणे कठीण आहे. पण त्याआधी आपण जाणून घेऊ की, या ट्रॉफीमध्ये किती सोनं आहे.
48 वर्षांआधी 1970 पर्यंत फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला 'जूलेस रिमेत ट्रॉफी' ट्रॉफी दिली जायची. पण 70 मध्ये तिनदा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलला ही ट्रॉफी कायमची देण्यात आली. 1974 मध्ये वर्ल्ड फुटबॉलची सर्वात मोठी संस्था फिफाने आपल्याच नावाने नवीन ट्रॉफी तयार केली.
किती आहे सोनं?
या ट्रॉफीची उंची 36 सेंटीमीटर असून ही ट्रॉफी 6 किलो 175 ग्रॅमच्या 18 कॅरेटच्या सोन्यापासून तयार करण्यात आली आहे.
चोरी झाली होती पहिली ट्रॉफी
कोणत्याही विजेत्या संघाला खरी ट्रॉफी दिली जात नाही. पण ब्राझीलने जेव्हा 1970 मध्ये तिसऱ्यांदा हा किताब मिळवला, तेव्हा त्यांना खरी ट्रॉफी नेहमीसाठी देण्यात आली. ही ट्रॉफी ब्राझील संघाने एका बुलेटप्रुफ कपाटात ठेवली. 1983 मध्ये काही लोकांना ही ट्रॉफी चोरी केली.
नंतर याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली होती. पण ती ट्रॉफी पुन्हा मिळाली नाही. असे सांगितले जाते की, ही ट्रॉफी त्या लोकांनी वितळवली आणि सोनं विकलं. त्या ट्रॉफीचा केवळ खालचा भाग मिळाला होता. हा भाग फिफाने आपल्या मुख्यालयात ठेवला होता.