FIFA World Cup 2018 : फुटबॉलच्या आकाराच्या बंगाल्यात राहतोय मेस्सी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 04:21 PM2018-06-15T16:21:56+5:302018-06-15T16:21:56+5:30
विमानातून मेस्सीचे घर पाहिल्यास ते एक फुटबॉलचे मैदान असल्यासारखे वाटते. पण ते मैदान नसून फुटबॉल मैदानाच्या आकाराचे शानदार घर आहे.
सचिन कोरडे : आपल्या जादुई खेळाने जगभरातील चाहत्यांना वेड लावणारा फुटबॉलपटू म्हणजे लियानेल आंद्रेस मेस्सी. खेळच नव्हे तर त्याची लाईफस्टाईलही अनेकांना भावते. मेस्सीचे शौकही काही कमी नाहीत. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, की मेस्सीच्या घरावरुन विमानाला जाण्यास सुद्धा बंदी आहे. कारण मेस्सीचे घर पर्यावरण प्रतिबंधित क्षेत्रात आहे. त्यामुळेच स्पॅनिश एअरलाईन्सला बार्सिलोना विमानतळाचा विस्तार करता आलेला नाही. पर्यावरण नियमांच्या कारणामुळे या जागेतून विमानाचे उड्डाण होणे शक्य नाही. एअरलाईन्सने यासाठी मेस्सी याला दोषी मानले आहे. पण मेस्सीचा बंगलाही भुरळ घालणाराच आहे...
मैदान नव्हे घर...
विमानातून मेस्सीचे घर पाहिल्यास ते एक फुटबॉलचे मैदान असल्यासारखे वाटते. पण ते मैदान नसून फुटबॉल मैदानाच्या आकाराचे शानदार घर आहे. मेस्सीचा हा बंगला अत्याधुनिक सुविधांनी नटलेला आहे. हा बंगला पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. वरुन पाहिल्यास चारही बाजूंनी दाट हिरवळ दिसते. जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ लुईस दी गॅरीदो याने हा बंगला साकारलाय. गॅरीदोने वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन मेस्सीपुढे ठेवले होते. त्यातून मेस्सीने याची निवड केली. मेस्सीचा जन्म हा अर्जेटिनात झाला असला तरी बार्सिलोनात घर बांधण्याचे त्याचे स्वप्नं होते. या बंगल्याची किंमत ही ७ मिलियन युरो इतकी आहे. पण मेस्सीसाठी ती फार कमीच. कारण या खेळाडूची कमाईच ही २३० मिलियन युरोजच्या जवळपास आहे.
बालमैत्रिणीशी विवाह
अर्जेटिनाचा खेळाडू मेस्सी याने २०१७ मध्ये त्याची बालमैत्रिण आणि गर्लफेंड एंटोनेला रोकोजो हिच्यासोबत विवाह केला. हे दोघेही एकमेकांचे शेजारी होते. वयाच्या ५ व्या वर्षी मेस्सीने रोकोजो हिल्या पहिल्यांदा पाहिले. त्यानंतर वयाच्या १३ व्या वर्षी तो बार्सिलोनाला निघून गेला. तेव्हापासून ते एकमेकांच्या अधिक संपर्कात होते. दोघेही प्रेमात पडले. २००८ मध्ये ते सोबतच राहायचे. लग्नापूर्वीच त्यांना दोन मुलेही झाली होती.