Fifa World Cup 2018 : हे तर खेळाडूंपेक्षा चमकदार ‘स्टार’ प्रशिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 11:38 AM2018-06-12T11:38:50+5:302018-06-12T16:57:54+5:30

फुटबॉलमध्ये प्रत्येक संघात किमान एक ‘स्टार’ खेळाडू असतो. त्या स्टार खेळाडूभोवती पूर्ण संघ असतो. हा स्टार खेळाडू ढेपाळला की संघच नांगी टाकतो, असे चित्र अनेकदा दिसून आले आहे

Fifa World Cup 2018: Luiz Felipe Scolari is one of the known an aggressive football coach | Fifa World Cup 2018 : हे तर खेळाडूंपेक्षा चमकदार ‘स्टार’ प्रशिक्षक

Fifa World Cup 2018 : हे तर खेळाडूंपेक्षा चमकदार ‘स्टार’ प्रशिक्षक

googlenewsNext

- चिन्मय काळे
मुंबई - फुटबॉलमध्ये प्रत्येक संघात किमान एक ‘स्टार’ खेळाडू असतो. त्या स्टार खेळाडूभोवती पूर्ण संघ असतो. हा स्टार खेळाडू ढेपाळला की संघच नांगी टाकतो, असे चित्र अनेकदा दिसून आले आहे. पण स्टार खेळाडूखेरीज संघाला आकार देण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो तो संघाचा प्रशिक्षक-व्यवस्थापक. विश्वचषकाच्या इतिहासात काही प्रशिक्षक असे आहेत की, त्यांनी ज्या-ज्या संघाना प्रशिक्षित केले त्या-त्या संघांनी स्पर्धेत अनपेक्षित मुसंडी मारुन साऱ्यांनाच धक्का दिला. फुटबॉल जगतात काही प्रशिक्षक हे खेळाडूंपेक्षाही अधिक चर्चेत राहिले. मूळ ब्राझिलीयन असलेले लुईझ फेलिप स्कोलारी हे त्यापैकीच एक.

लुईझ फेलिप स्कोलारी हे आक्रमक प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. मैदानावर चूक करणारा खेळाडू कितीही मोठा असो, त्याला थेट ते झापतात. स्कोलारी यांनी सर्वात आधी २००१ मध्ये ब्राझील संघाची धुरा सांभाळली. त्यावेळी १९९८ च्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या धक्क्यातून ब्राझीलचा संघ अद्यापही सावरलेला नव्हता. विश्वचषक पात्रता फेरीचे सामने सुरू झाले होेते. खराब कामगिरीमुळे ब्राझील विश्वचषकाच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर होता. पण स्कोलारी यांनी ब्राझीलच्या खेळाडूंची अक्षरश: शाळा घेतली. रोमारिओसारख्या अत्यंत यशस्वी व लोकप्रिय खेळाडूला बाहेर काढले. अखेर संघ २००२ च्या विश्वचषकात केवळ पात्रच झाला नाही तर स्पर्धेत अपराजित राहून पाचव्यांदा विश्वचषक घेऊन मायदेशी परतला. पुढे आक्रमक धोरणामुळे वाद होऊन स्कोलारी यांनी ब्राझीलचा संघ सोडला.

हेच स्कोलारी पुढे २००३ मध्ये पोर्तुगालचे प्रशिक्षक झाले. वर्षभरातच २००४ च्या युरो चषकात त्यांनी पोर्तुगालला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. स्कोलारी यांची सर्वात मोठी परीक्षा २००६ मध्ये जर्मनीत होणाºया विश्वचषकात लागणार होती. २००६ पूर्वीच्या १७ विश्वचषकांमध्ये पोर्तुगालचा संघ फक्त दोन वेळा पात्र झाला व त्यातही साखळी फेरीतच गारद झाला होता. अशा या पोर्तुगालच्या संघात आक्रमकता निर्माण करण्याचे काम स्कोलारी यांनी केले. पोर्तुगालच्या संघाला तयार करताना स्कोलारी यांनी समोरच्या संघाची लय तोडण्याची नवी रीत फुटबॉल विश्वात आणली. त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली. पण पर्व न करता या पद्धतीच्या जोरावरच पोर्तुगाल नेदरलॅण्ड्स, इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना हरवत थेट उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. यानंतर स्कोलारी यांनी पोर्तुगालचे प्रशिक्षकपद सोडले. पुन्हा २०१२ मध्ये ते पुन्हा ब्राझीलच्या संघात रुजू झाले.

२०१४ चा विश्वचषक मायदेशात होत असल्याने तो जिंकण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर होते. पण नेमार दुखापतग्रस्त झाल्याने ब्राझीलचा उपांत्य लढतीत जर्मनीकडून मानहानीकारक पराभव झाला. त्यानंतर स्कोलारी यांंनी ब्राझीलचे प्रशिक्षकपद सोडले. पण त्यांचा आक्रमक स्वभाव फुटबॉल जगतात कायम लक्षात राहणारा आहे.

शांत पण कडक स्वभावाचे डच (नेदरलॅण्ड्स) प्रशिक्षक गस हिडींक. नेदरलॅण्ड्सच्या संघाची विश्वचषकातील कामगिरी तशी उल्लेखनीय राहीली आहे. १९७४ व १९७८ च्या विश्वचषकात सलग दोन वेळा अंतिम फेरी या संघाचे गाठली होती. पण त्यानंतर १९९४ च्या विश्वचषकापर्यंत नेदरलॅण्ड्सची कामगिरी सुमार होती. प्रशिक्षक या नात्याने कठोर असलेल्या हिडींक यांनी संघातील हेवेदावे दूर केले. नेदरलॅण्ड्समधील फुटबॉल चाहत्यांचा विरोध असतानाही एडगर डेव्हिड्सारख्या अनुभवी मिड फिल्डरला (नंतर विश्वचषकाच्या तोंडावर पुन्हा संघात घेतले) संघाबाहेर केले. फार कमी बोलणे पण प्रशिक्षणावर भर, असा त्यांचा स्वभाव. त्याचआधारे प्रशिक्षित केलेल्या नेदरलॅण्ड्सच्या संघाने १९९८ च्या विश्वचषकात अर्जेंटीनासारख्या बलाढ्य संघाला नमवत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. अखेर उपांत्य फेरीतही मातब्बर ब्राझीलला नेदरलॅण्ड्सने कडवी झुंज दिली. पेनॉल्टी शूटमध्ये कर्णधार फिलीप कोकूची एक किक बाहेर गेली आणि संघाचा पराभव झाला. पण नेदरलॅण्ड्सच्या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मारलेली धडक त्यावेळी चर्चेचा विषय होती.

पराभवानंतर नेदरलॅण्ड्सने गस हिडींक यांची उचलबांगडी केली. हिडींक यांना २००२ मध्ये दक्षिण कोरियाने पाचारण केले. विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण कोरियाची त्यावेळेपर्यंतची कामगिरी अत्यंत सुमार होती. पण २००२ चा विश्वचषक दक्षिण कोरियातच होत असल्याने हिडींक यांच्यावर अपेक्षांचे ओझे होते. या विश्वचषकात दक्षिण कोरियाच्या संघाने केलेली कामगिरी हिडींक यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. त्यावेळी तुलनेने दुबळ्या असलेल्या दक्षिण कोरियाच्या संघाने पोर्तुगाल, पोलंड, इटली आणि स्पेनसारख्या बलाढ्य संघावर लिलया मात केली. विश्वचषकातील पहिला विजय दक्षिण कोरियाने याच स्पर्धेत नोंदवला.

उपांत्य फेरीत जर्मनीने दक्षिण कोरियाचा पराभव केला असला तरी हिडींक यांनी केलेली संघाची बांधणी उल्लेखनीय अशीच ठरली. दक्षिण कोरियाला उपांत्य फेरीपर्यंत नेणाºया हिडींक यांना तेथील सरकारने मानद नागरीकत्त्व बहाल केले. ज्या मैदानावर दक्षिण कोरियाने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला त्या स्टेडीयमला हिडींक यांचे नाव देण्यात आले. त्यांच्यावरील म्युझियम नेदरलॅण्ड्समध्ये उभे करण्यात आले आहे. तेथे प्रत्येक दक्षिण कोरियन आवर्जून भेट देतो. पण अशा या हिडींक यांना नेदरलॅण्ड्स फुटबॉल असोसिएशन ओळखू न शकल्याची खंत फुटबॉल चाहते आजही व्यक्त करतात.

एकेकाळी फुटबॉलचा दैदीप्यमान इतिहास जपलेल्या उरूग्वेची कामगिरी १९७० नंतर ढासळत होती. १९९० च्या विश्वचषकात उरूग्वेच्या संघाने २० वर्षांनी पहिल्यांदा विजय मिळवत बाद फेरी गाठली. तो दिवस उरूग्वेसाठी जल्लोषाचा ठरला होता. आॅस्कर तबरेझ या प्रशिक्षकांमुळे ते त्यावेळी शक्य झाले होते. त्यानंतर तबरेझ यांनी उरूग्वे संघाचे प्रशिक्षकपद सोडले. त्यानंतर २० वर्षे उरूग्वेची कामगिरी पुन्हा ढासळली. चारपैकी दोन विश्वचषकात पात्र न होणे व दोन विश्वचषकात सुमार कामगिरीचा सामना संघाला करावा लागला. यामुळे पुन्हा तबरेझ यांना पुन्हा पाचारण करण्यात आले.

शांत स्वभाव पण नियोजनबद्ध खेळ, हे त्यांच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य आहे. सुमार कामगिरी करणाºया उरूग्वेच्या संघाला आॅस्कर तबरेझ यांनी ४० वर्षांनी २०१० मध्ये उपांत्य फेरीत पोहोचवले. अव्वल खेळाडूपैकी एक असलेला लुईझ सुआरेझला आॅस्कर यांनीच तयार केले. आॅस्कर हे या विश्वचषकातही उरूग्वेच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. सलग १२ वर्षे एकाच संघासोबत राहीलेले ते आजवरचे एकमेव प्रशिक्षक आहेत.

Web Title: Fifa World Cup 2018: Luiz Felipe Scolari is one of the known an aggressive football coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.