FIFA World Cup 2018: मॅरेडोना यांनी पुन्हा ओढवून घेतला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 05:13 PM2018-06-18T17:13:04+5:302018-06-18T17:13:04+5:30
नियम हे मोडण्यासाठी असतात, असं कदाचित अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांना वाटत असावं. कारण रशियामध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक मैदानात पाहत असताना मॅरेडोना यांनी एक नियम मोडीत काढला आहे.
मॉस्को : नियम हे मोडण्यासाठी असतात, असं कदाचित अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांना वाटत असावं. कारण रशियामध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक मैदानात पाहत असताना मॅरेडोना यांनी एक नियम मोडीत काढला आहे. मैदानामध्ये धुम्रपान करण्यास मनाई आहे. पण मॅरेडोना यांनी मैदानातच सिगार ओढत नियम धाब्यावर बसवले आणि पुन्हा वाद ओढवून घेतला. पण ही गोष्ट त्यांनी केली नेमकी कधी, ते पाहूया.
वाद-विवाद आणि मॅरेडोना यांचे अतुट असे नातं आहे. आतापर्यंत बरेच वाद त्यांच्या नावावर आहेत. पण मॅरेडोना यांनी मात्र आपल्या वागण्यात कोणताही बदल केलेला नाही. मॅरेडोना हे अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत. बऱ्याच जणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. पण मॅरेडोना यांच्याकडून आदर्शवत वागणं अपेक्षित असलं तरी ते तसं होताना दिसत नाही.
मॅरेडोना हे अर्जेंटीना आणि आईसलँड यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्डेडियममध्ये आले होते. या सामन्यात अर्जेंटीनाला 1-1 अशा बरोबरीत सामना सोडवावा लागला आणि त्यांचे चाहते निराश झाले. या सामन्यात अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला स्पॉट किक मारण्यातही अपयश आले होते. हा सामना पाहत असताना मॅरेडोना यांनी आपल्या खिशातून सिगार काढली आणि कश मारायला सुरुवात केली. अनेकांनी त्यांना पाहिले, पण कुणीही अधिकृत तक्रार मात्र केली नाही. या साऱ्या प्रकारानंतर मॅरेडोना यांनी आयोजक आणि चाहत्यांची माफी मागितली आहे.