FIFA World Cup 2018: ब्ल्यू समुरार्इंनी दिला स्वच्छतेचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 09:27 PM2018-06-20T21:27:43+5:302018-06-20T21:27:43+5:30
सोमवारी जेम्स रॉड्रिग्ससारख्या गुणवान खेळाडूचा समावेश असलेल्या कोलंबिया सारख्या अनुभवी व मातब्बर संघाला २-१ अशा गोलफरकाने नमविल्यानंतर जपानी पाठिराख्यांनी जल्लोष तर केलाच पण सामना संपवून मैदानाबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी मैदानाची सफाईसुद्धा केली.
सचिन खुटवळकर: जपान हा फुटबॉलमधील तसा जेमतेम क्षमतेचा संघ. विश्वचषक स्पर्धेत जपानचा इतिहास फारसा देदिप्यमान वगैरे नाही. परंतु या संघाचे आणि त्यांच्या पाठिराख्यांची एक अशी खुबी आहे की, जपानी माणसाच्या प्रेमात अख्खे जग पडते. ही खुबी म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत असलेली सजगता.
सोमवारी जेम्स रॉड्रिग्ससारख्या गुणवान खेळाडूचा समावेश असलेल्या कोलंबिया सारख्या अनुभवी व मातब्बर संघाला २-१ अशा गोलफरकाने नमविल्यानंतर जपानी पाठिराख्यांनी जल्लोष तर केलाच पण सामना संपवून मैदानाबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी मैदानाची सफाईसुद्धा केली. कोलंबियन पाठीराखे मात्र पराभवामुळे नाराज झाले आणि सामना संपताच मैदानाबाहेर गेले. प्रेक्षागारातील कचरा उचलण्याचा सभ्यपणा जपानी प्रेक्षकांनी दाखवून पुन्हा एकदा फुटबॉलप्रेमींची मने जिंकली.
गत विश्वचषक स्पर्धेत आयव्हरी कोस्ट संघाविरुद्ध जपानला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतरही जपानी प्रेक्षकांनी आपल्या संघाला आणि देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली होती. मैदानात पडलेला कचरा उचलून त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला होता.
-जपानी प्रेक्षकांपासून प्रेरीत होऊन सेनेगल संघाच्या पाठिराख्यांनीही पोलंडविरुद्धच्या सामन्यानंतर मैदानात साफसफई केली होती. योगायोग म्हणजे, सेनेगलनेही पोलंडला २-१ अशाच गोलने पराभूत केले.
-जपानी फुटबॉलप्रेमी ‘ब्ल्यू समुराई’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे फिफा विश्वचषक स्पर्धेत इतर देशांचे प्रेक्षकही आता धडा घेतील, अशी अपेक्षा करुया.