Fifa World Cup 2018 : विश्वचषकाच्या रंगात रंगले मॉस्को
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:20 AM2018-06-13T05:20:26+5:302018-06-13T05:20:26+5:30
विश्वचषक फुटबॉलचा यजमान रशिया जगाला नवे रूप दाखवू इच्छितो. यानिमित्ताने मुख्य आयोजन स्थळ असलेल्या मॉस्को शहराला नववधूसारखे सजविण्यात आले आहे. रस्त्याच्या काठावर सुंदर झाडे लावण्यापासून अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनपर्यंत सर्वत्र सजावट पाहिल्यास हे शहर विश्वचषकाच्या रंगात न्हावून निघाल्यासारखे दिसते.
मॉस्को : विश्वचषक फुटबॉलचा यजमान रशिया जगाला नवे रूप दाखवू इच्छितो. यानिमित्ताने मुख्य आयोजन स्थळ असलेल्या मॉस्को शहराला नववधूसारखे सजविण्यात आले आहे. रस्त्याच्या काठावर सुंदर झाडे लावण्यापासून अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनपर्यंत सर्वत्र सजावट पाहिल्यास हे शहर विश्वचषकाच्या रंगात न्हावून निघाल्यासारखे दिसते.
मॉस्कोत सर्वत्र झगमगाट आहे. जगातील नागरिकांनी बदललेल्या रशियाची एक झलक पहावी, इतकी काळजी सजावटीत घेण्यात आली आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या फुटबॉलच्या या क्रीडाकुंभाच्या रूपाने मॉस्कोचे अप्रतिम सौंदर्य पाहुण्यांनी न्याहाळावे याचीच यजमानांना प्रतीक्षा आहे. काहींच्या मते रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी विश्वचषकाचे आयोजन अत्यंत प्रतिष्ठेचे केले. चीनने बीजिंग आॅलिम्पिकचे आयोजन ज्या थाटात पार पाडले, अशाच प्रकारचे आयोजन करण्यात कुठलीही कसर शिल्लक राखायची नाही, असे त्यांनी आदेशही दिले आहेत. रशियातील नागरिक स्पर्धेनिमित्त येथे येतील तेव्हा विदेशी पाहुण्यांप्रमाणे त्यांना देखील मॉस्को शहराच्या प्रेमात पडायला आवडेल. जुन्या सोव्हियत युनियनचा उल्लेख इतिहासात काहीसा वेगळा आहे. तो साचलेपणा दूर करण्याची धडक मोहीमच या आयोजनाद्वारे हाती घेण्यात आली आहे.
एक स्थानिक नागरिक म्हणाला,‘फिफा विश्वचषकाचा अर्थ असा की जगातील लोक येथे येतील. वास्तव्य करतील. रशियाबाबत जाणून घेतील. ते परततील तेव्हा रशियाची नवी ओळख स्मृतीत साठवून जातील. त्यांचा पूर्वग्रह दूर होईल आणि ते नव्या जाणिवेने रशियाबाबत विचार करतील.’
पर्यवेक्षकांचे मते, रशियाने ज्या प्रकारे सोची हिवाळी आॅलिम्पिकचा प्रचार केला तसा प्रचार फिफा आयोजनाचा झालेला नाही. यामुळेच यजमान देशाच्या राष्टÑीय संघाची कामगिरी उंचावलेली दिसत नाही.
सुरुवातीला आयोजनाची तयारी मंद होती पण जसजशी वेळ जवळ आली तसा तयारीला जोर आला. महिनाभर चालणाºया या आयोजनातील ठळक नोंदी घेण्यासाठी, खेळाडूंच्या हालचाली टिपण्यासाठी जगातील हजारो पत्रकार येथे दाखल झाले आहेत. याशिवाय ज्यांचा देश या आयोजनाचा भाग नाही अशा देशातील पत्रकार आणि छायाचित्रकारांनीही येथे हजेरी लावली. फिफा विश्वचषकाची ही जादू सर्वांना खेचून आणणारी आहे.
रशियाच्या कामगिरीबाबत चाहते आश्वत नाहीत...
राष्टÑीय संघाची कामगिरी कशीही असो पण लोकांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचला आहे. पाहुण्यांचे आदरातिथ्य असो वा आयोजनस्थळांची तयारी असो, शहरातील सर्व टप्प्यांवर सुरक्षा यंत्राणा सावध आहे. रशियाचा संघ फारसा चांगला नाही. सर्वांत कमकुवत गटात त्यांचा समावेश आहे. या गटात उरुग्वे अव्वल राहण्याची शक्यता आहे. तथापि इजिप्त आणि सौदी अरबसाररख्या संघांच्या उपस्थितीमुळे रशियाला पुढील फेरीत जाण्याची संधी असेल. स्थानिक चाहते
मात्र संघाच्या कामगिरीबाबत आश्वस्त नाहीत.
विश्वचषकाच्या तयारीचा एक भाग म्हणून ‘रेड स्क्वेअर’जवळ लाईट शो चे आयोजन करण्यात येत आहे. उंच इमारतींवर विश्वचषकाचे होर्डिंग्स झळकविण्यात आले. मनेगी संग्रहालयापुढे स्पर्धेशी संबंधित वस्तू सजविण्यात आल्या.
मास्को येथे उद्घाटन आणि समारोप सोहळ्यासह एकूण 12 सामने खेळविले जातील. प्रख्यात लुजनिकी स्टेडियममध्ये सलामीचा सामना आणि उपउपांत्यपूर्व सामना, एक उपांत्य सामना आणि अंतिम सामना रंगणार आहे.
विश्वचषक फुटबॉलचा ज्वर आता संपूर्ण जगाला चढला असून यजमान रशिया फुटबॉलमय झाले आहे. रशियामध्ये प्रत्येक ठिकाणी याचा प्रत्यय येतो. विविध दुकानांमध्ये फुटबॉल आणि स्पर्धेतील सहभागी राष्ट्रांचे ध्वज लक्ष वेधून घेत आहेत.
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू कोण.. मॅरेडोना की मेस्सी? अशी चर्चा अनेकदा घडली असली, तरी यंदाच्या विश्वचषकात मेस्सीला मॅरेडोनाचा सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम खुणावत आहे.
सरावातही मेस्सी... मेस्सी...
ब्रोनिल्स : अर्जेंटना संघ विश्वचषकाची कसून तयारी करीत आहे. संघ सरावाला पोहोचला तोच ४०० चाहत्यांनी लियोनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली. एक तास सराव चालला. यावेळेत चाहते मेस्सी... मेस्सी अशा घोषणा सातत्याने देत होते. कडाक्याची थंडी आणि ढगाळ हवामान असे येथील वातावरण आहे. मधूनच सूर्याचे दर्शन होते. सरावाच्या वेळी कोवळे ऊन पडताच चाहते बाहेर पडले. चाहत्यांनी मेस्सीचे मुखवटे, बार्सिलोना व अर्जेंटिनाचे ध्वज सोबत आणले होते. सराव आटोपताच युवा चाहत्यांनी स्वाक्षरी घेण्यासाठी मेस्सी सभोवताल गराडा घातला.
मेस्सीची नजर विक्रमावर
नवी दिल्ली : रशियात गुरुवारपासून फिफा फुटबॉल विश्वचषकाचा महासंग्राम सुरू होईल आणि यासह जुने विक्रम मोडून नव्या विक्रमांची नोंद होण्याचा प्रवास सुरू होईल.
यात सर्वात मोठे आकर्षण असेल तो अर्जेंटिनाचा स्टार लियोनेल मेस्सी. तो विश्वचषकात सर्वाधिक गोल नोंदविणारा कर्णधार बनू शकतो. विश्वचषकात कर्णधार या नात्याने सर्वाधिक गोल नोंदविण्याचा विक्रम अर्जेंटिनाचा माजी स्टार दिएगो मेरेडोनाच्या नावे आहे. अर्जेंटिनाचे नेतृत्व करताना त्याने विश्वचषकात ६ गोल केल असून हा विक्रम मोडण्याची मेस्सीला संधी असेल.
मेस्सीने विश्वचषकात पाच गोल केले. २०१४ च्या विश्वचषकात त्याने हे गोल केले होते.
जर्मनीचा थॉमस म्युलर हा तीन विश्वचषकात पाच वा त्याहून अधिक गोल नोंदविणारा पहिला खेळाडू बनण्याच्या इराद्यासह उतरेल. शिवाय त्याचा सहकारी मिरोस्लाव क्लोसे व पेरुचा तियोफिलो कुबिलास या दोघांनी एका विश्वचषकात पाच किंवा त्याहून अधिक गोल केले आहेत. क्लोसे हा विश्वचषकात सर्वाधिक १६ गोल नोंदविणारा खेळाडू असून, म्युलरचे १० गोल आहेत. इजिप्तचा गोलरक्षक आणि कर्णधार एसाम अल हैदरी हा रशियात सामना खेळल्यास विश्वचषक खेळणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू बनेल. हैदरीचे वय ४५ वर्षे पाच महिने इतके आहे.