FIFA World Cup 2018 : जेव्हा चोरी झाली होती फीफा वर्ल्ड कप ट्रॉफी, हा श्वान बनला होता 'हिरो'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 05:33 PM2018-06-12T17:33:32+5:302018-06-12T17:37:56+5:30
1966 चा फीफा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण या स्पर्धेच्या काही दिवस आधीच ही घटना घडली होती.
फीफा वर्ल्ड कप दरम्यान मैदानात तर अनेक आश्चर्यजनक गोष्टी बघायला मिळतात. त्यासोबतच मैदानाबाहेरही काही काही धक्कादायक घटना घडतात. अशीच एक घटना 1966 मध्ये फीफा वर्ल्ड कपवेळी घडली होती. 1966 चा फीफा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण या स्पर्धेच्या काही दिवस आधीच ही घटना घडली होती.
1966 मध्ये वर्ल्ड कपच्या चार महिन्यांआधी वर्ल्ड कप चोरीला गेला होता. ही ट्रॉफी लंडनच्या वेस्टमिनिस्टरच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. तेथून ही ट्रॉफी चोरी करण्यात आली होती. या ट्रॉफीची किंमत त्यावेळी तीस हजार पाऊंड इतकी होती.
फीफा वर्ल्ड कप 1966 ची ट्रॉफी चोरी झाल्यानंतर इंग्लंडमध्ये एकच गोंधळ उडाला होता. लंडन पोलिसांनी या ट्रॉफीचा फार शोध घेतला पण ट्रॉफी त्यांच्या हाती लागली नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे चोरीला गेलेली ही वर्ल्ड कप ट्रॉफी पिकल नावाच्या एका श्वानाने शोधून काढली होती. एक दिवस डेव नावाचा एक व्यक्ती आपल्या श्वानासोबत बाहेर फिरत होता. अचानक या श्वानाने शेजारच्या व्यक्तीच्या कारला चारही बाजूने चकरा मारण्यास सुरुवात केली. डेव यांनी कारकडे लक्ष देऊन पाहिले तेव्हा त्यांना एका पेपरमध्ये गुंडाळलेली वर्ल्ड कप ट्रॉफी दिसली.
त्यानंतर डेव यांनी ही बाब पोलिसांना सांगितली होती. नंतर वर्ल्ड कप ट्रॉफी शोधण्याबाबत डेव यांचा श्वान पिकल याला सन्मानित करण्यात आले होते. त्यासोबतच त्याला आजीवन खाण्या-पिण्याच्या वस्तू देण्याची घोषणा करण्यात आली होती.