FIFA World Cup 2018 : पाहुणचारासाठी रशिया सज्ज; एक लाखाहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:55 AM2018-06-09T01:55:38+5:302018-06-09T01:55:38+5:30
विश्वचषक फुटबॉलला १४ जूनपासून सुरुवात होत आहे. १५ जुलैपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभाचा थरार ‘याची देही याची डोळा’अनुभवण्यासाठी जगभरातील एक लाखाहून अधिक प्रेक्षक हजेरी लावण्याची शक्यता असल्याने यजमान रशिया पाहुण्यांच्या सरबराईस सज्ज झाला आहे.
मॉस्को : विश्वचषक फुटबॉलला १४ जूनपासून सुरुवात होत आहे. १५ जुलैपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभाचा थरार ‘याची देही याची डोळा’अनुभवण्यासाठी जगभरातील एक लाखाहून अधिक प्रेक्षक हजेरी लावण्याची शक्यता असल्याने यजमान रशिया पाहुण्यांच्या सरबराईस सज्ज झाला आहे.
विश्वचषकाच्या तिकिटांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. कालपर्यंत २४ लाखाहून अधिक तिकिटे विकली गेली, असे फिफाने म्हटले आहे. त्यातील १५ लाखाहून अधिक तिकिटे रशियाच्या बाहेर विकली गेली. आतापर्यंत एक लाख तिकिटे प्रेक्षकांना देण्यात आल्याचे फिफाच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.
अमेरिकेचा संघ यंदा पात्रता गाठण्यात अपयशी ठरला. तरीही रशियापाठोपाठ सर्वाधिक तिकिटांची मागणी आली ती अमेरिकेतूनच. तेथे ८६,७१० तर ब्राझीलमध्ये ७१७८७, कोलंबियात ६४२३१ आणि जर्मनीत ६०४७५ तिकिटे विकली गेली. नेदरलँड संघ देखील यंदा अंतिम फेरीचा अडथळा पार करू शकलेला नाही. पण तेथील चाहतेही सामने पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. (वृत्तसंस्था)
- यजमान रशियातील १२ शहरांतील सडकेवर जुलैपर्यंत विविध भाषा, गीते, ध्वज आणि विविध देशांची संस्कृती दृष्टीस पडणार आहे. रशियाने पायाभूत सुविधांवर १३ अब्ज डॉलरचा खर्च केला. आयोजन समितीचे प्रमुख अॅलेक्सेई सोरोकिन म्हणाले,‘ सहा यजमान शहरांमधील विमानतळांवर नवे टर्मिनल्स आणि यजमान शहरात २१ नवे हॉटेल्स उभारण्यात आले आहेत. स्पर्धेनिमित्त १४ रुग्णालयांची देखील उभारणी करण्यात आली आहे.’
चाहत्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी
विश्वचषकाचे आयोजन ही फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असली, तरी या काळात कुटुंबीय आणि मित्रांसोबत मौजमस्तीत रंगलेल्या फुटबॉलप्रेमींनी तब्येतीची काळजी न घेतल्यास ते आजारी पडू शकतात. अशावेळी जीव गमवावा लागू शकतो.
या संदर्भात संशोधकांनी आरोग्य जपण्याच्या टिप्स दिल्या असून कार्डिओव्हॅस्क्यूलर (हृदयरोग)अपघातापासून बचाव करण्यास सांगितले
आहे. चाहत्यांना अतिआनंदामुळे हृदयगती बंद पडण्याचा धोका असतो. आयोजनादरम्यान असुरक्षित संभोग, अपघात, आत्महत्या आणि हिंसाचारात वाढ होण्याची शक्यता असते.अमेरिकन जर्नल आॅफ मेडिसिनच्या २०१० च्या अंकात प्रकाशित शोध प्रबंधात मोठ्या स्पर्धेदरम्यान हृदयाघात होण्याचे
प्रमाण अधिक असल्याचे म्हटले आहे.
आपल्या पसंतीचा संघ हरला किंवा जिंकला तरी हृदयरुग्ण तणावाच्या स्थितीत असतात. आपला संघ गोल नोंदविण्यात अपयशी ठरला किंवा प्रतिस्पर्धी संघाने गोल नोंदविला की
कमकुवत हृदय असलेल्या लोकांच्या मनावर विपरीत परिणाम
होतो, असे पाहणीत आढळून आले आहे. हृदयरोग पीडितांनी फुटबॉलसारख्या खेळाचा केवळ आनंद लुटावा, जय- पराजय मनाला लावून घेऊ नये, असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.