FIFA World Cup 2018: इजिप्तला धक्का, रशियाचा 3-1नं विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:29 AM2018-06-20T01:29:25+5:302018-06-20T01:43:56+5:30
फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेत रशियानं आक्रमक खेळाच्या जोरावर इजिप्तवर 3-1नं विजय मिळवला असून, रशियाचा हा लागोपाठ हा दुसरा विजय ठरला आहे.
सेंट पीटर्सबर्ग- रशियाने फिफा फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी अ गटात इजिप्तवर ३-१ ने विजय नोंदवित बाद फेरीकडे कूच केली. मध्यंतरापर्यंत रशियाला गोल नोंदविण्यापासून दूर ठेवणा-या इजिप्तने उत्तरार्धातील खेळ सुरू होताच सामन्यातील ४७ व्या मिनिटाला स्वयं गोल करीत रशियाचे खाते उघडून दिले. गोलजाळीजवळून चेंडू डिफ्लेक्ट होताच इजिप्तचा अहमद फादी याच्या गुडघ्याला लागून चेंडू गोलजाळीत स्थिरावला. ५९व्या मिनिटाला डेनिस चेरिशेव याने एकट्याच्या बळावर चेंडू दमटत रशियाची आघाडी दुप्पट केली.
तीन मिनिटानंतर आर्टेम झयूबा याने सुरेख गोल नोंदवून इजिप्तवर ३-० अशी आघाडी मिळवून दिली. इजिप्तला दिलासा देणारा गोल मोहम्मद सलाहने ७३ व्या मिनिटाला नोंदवून पराभवाचे अंतर कमी केले. त्याआधी, ७२ व्या मिनिटाला सलाहला प्रतिस्पर्धी खेळाडूने धक्का देत पाडले. त्यावर व्हीएआर प्रणालीनुसार इजिप्तला पेनल्टी बहाल करण्यात आली. सलाहने ही संधी साधून चेंडू गोलजाळीत टाकला. नंतर इजिप्तला गोल नोंदविणे कठीण झाले होते. पाच मिनिटांच्या अतिरिक्त वेळेचा लाभ देखील इजिप्तचे खेळाडू घेऊ शकले नाहीत.
यंदाच्या विश्वचषकाची धडाक्यात सुरुवात करणा-या रशियाचा आत्मविश्वास उंचावला आहे.सौदी अरबवर ५-० ने एकतर्फी मात केल्यानंतर यजमानांचा हा दुसरा विजय होता. दुसरीकडे सलग दुस-या पराभवानंतर इजिप्तचे फुटबॉल महाकुंभातून बाहेर होणे जवळपास निश्चित झाले. डेनिस चेरीशेव्ह, आर्टेम झयूबा यांनी सलामीच्या सामन्याप्रमाणे इजप्तिविरुद्ध शानदार कामगिरी करताना प्रशिक्षक स्टॅनिसलाव्ह चचेसोव्ह यांचा विश्वास सार्थ ठरवला. सामन्यात बाजी मारून तीन गुण मिळवून ‘अ’ गटात अव्वल स्थान अबाधित राखले. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात सौदी अरबवर मिळवलेला दणदणीत विजय, फॉर्मात असलेली आक्रमकांची फळी आणि त्याला लाभलेली बचावपटूंची योग्य साथ या सर्व सकारात्मक बाबींच्या पार्श्वभूमीवर रशियाने इजिप्तला अलगद धूळ चारली. पहिल्या सामन्यात इजिप्तला उरुग्वेविरुद्ध ९०व्या मिनिटाला झालेल्या गोलमुळे पराभव स्वीकारावा लागला होता.