FIFA World Cup 2018: स्वित्झर्लंडने ब्राझीलला 1-1 बरोबरीत रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 02:12 AM2018-06-18T02:12:10+5:302018-06-18T02:12:10+5:30
फिफा विश्वकप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्वित्झर्लंडने ब्राझीलला १-१ बरोबरीत रोखले.
रोस्तोव्ह आन दोन : फिफा विश्वकप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्वित्झर्लंडने ब्राझीलला १-१ बरोबरीत रोखले. ब्राझीलतर्फे फिलिपे काउटिन्होने (१७ वा मिनिटं) तर स्वित्झर्लंडतर्फे स्टीव्हन झुबेर (५० वा मिनिटं) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. पाचवेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या ब्राझीलला अखेर १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. मध्यंतरापर्यंत ब्राझीलने १-० अशी आघाडी घेतली होती.
त्याआधी जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश असलेल्या ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमार फिटनेसबाबतच्या साशंकता दूर करीत आज मैदानात उतरला. गॅब्रियल जीससच्या साथीने त्याने सुरुवातीला काही चांगल्या चाली रचल्या, पण त्याला गोल नोंदवता आला नाही. गेल्या विश्वकप स्पर्धेत जर्मनीविरुद्ध उपांत्य फेरीत ७-१ ने लाजिरवाणा पराभव स्वीकारणा-या ब्राझीलने आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला.
ब्रेकला एक मिनिटाचा अवधी शिल्लक असताना नेमारला गोल नोंदवण्याची चांगली संधी होती, पण थियागो सिल्वाच्या पासवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविण्यात तो अपयशी ठरला. जगातील सर्वांत महागडा खेळाडू असलेल्या नेमारला पहिल्या हाफमध्ये स्विस खेळाडूंनी जखडून ठेवले होते.