Fifa World Cup 2018 : या बलाढ्य संघांवर असेल नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 02:01 AM2018-06-12T02:01:58+5:302018-06-12T02:01:58+5:30
दोन दिवसांनंतर फुटबॉलच्या सर्वांत प्रतिष्ठेच्या जेतेपदासाठी जगातील ३२ संघांदरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे. एकाच वेळी विविध स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार असल्याने फुटबॉलविश्वाची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे.
दोन दिवसांनंतर फुटबॉलच्या सर्वांत प्रतिष्ठेच्या जेतेपदासाठी जगातील ३२ संघांदरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे. एकाच वेळी विविध स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार असल्याने फुटबॉलविश्वाची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल ही विश्वचषक स्पर्धेची खासियत असल्याने यंदाची स्पर्धा कशाप्रकारे धक्के देणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. या निमित्ताने या दिग्गज संघांवर सर्वांची नजर राहील.
ब्राझील : गेल्यावळी २०१४ मध्ये मायदेशात जेतेपद पटकावण्याच्या ब्राझीलच्या स्वप्नांचा जर्मनीने ७-१ ने पराभव करीत चुराडा केला होता. पेंटा म्हणजे पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या ब्राझील संघाकडे आता आणखी एक संधी आहे. कारण प्रशिक्षक टिटेने त्यांना पराभवाच्या निराशेतून बाहेर काढताना त्यांच्यात पुन्हा जेतेपद पटकावण्याची नवी ऊर्मी निर्माण केली आहे. डॅनी अल्वेस दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाचा समतोल ढासळला आहे, पण नेमार पुन्हा फिट असून मैत्रीपूर्ण लढतीत त्याने गोलही नोंदवले आहेत. मॅन्चेस्टर सिटीचा गॅब्रियल जीसस फॉर्मात आहे.
फ्रान्स :आपल्या मैत्रीपूर्ण लढतीत अमेरिकेविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे दिदियेर डेसचॅम्प्सला बरीच सुधारणा करण्याची गरज आहे, याची कल्पना आली असेल. आयर्लंड व इटली या संघांना त्यानंतरच्या लढतींमध्ये फ्रान्सने पराभूत केले. त्यात पॉल पोग्बाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. फ्रान्स उपांत्य फेरी गाठण्याचा दावेदार आहे.
अर्जेंटिना - पात्रता फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर अर्जेंटिना संघ रशियात दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यात इस्त्राइलविरुद्धचा सराव सामना रद्द झाल्यामुळे ते नाराज झाले. त्यांना सामना खेळण्याचा पुरेसा सराव मिळालेला नाही. संघाची भिस्त बºयाच अंशी लियोनेल मेस्सीवर अवलंबून आहे. तो विश्वकप न जिंकता आल्याचा कलंक पुसून टाकण्यास प्रयत्नशील असेल.
स्पेन : ब्राझीलप्रमाणे स्पेनसुद्धा २०१४ ची निराशाजक कामगिरी विसरण्यास प्रयत्नशील राहील. गेल्या वेळी त्यांना बाद फेरीत स्थान मिळवता आले नव्हते. दोन वर्षांपासून जुलेन लोपेटेगुई यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळताना स्पेनने एकही सामना गमावलेला नाही. स्पेनला ‘ब’ गटाच्या पहिल्या लढतीत पोर्तुगालविरुद्ध खेळायचे आहे. संघातील सात खेळाडू युरो २०१६ च्या संघात खेळले होते. त्यावेळी संघाला इटलीविरुद्ध २-० ने पराभव स्वीकारावा लागला होता.
जर्मनी : गतविजेता जर्मनी संघ प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कायम बलाढ्य संघ मानला जातो, पण प्रदर्शनी सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी विशेष चांगली झालेली नाही. जोकिम ल्यूच्या संघाला सलग पाच सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही आणि सौदी अरबविरुद्ध २-१ ने विजय मिळवताना त्यांना बराच घाम गाळावा लागला. गोलरक्षक मॅन्युअल न्यूअेर सप्टेंबरपासून दुखापतीच्या भीतीमुळे विशेष खेळलेला नाही. जर्मनी संघाने गेल्या चार विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. यावेळीही त्यांचा निर्धार चमकदार कामगिरी करण्याचा असेल.