FIFA World Cup 2018 : पहिल्या सत्रात उरुग्वेच्या सुआरेझने केले निराश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 06:33 PM2018-06-15T18:33:25+5:302018-06-15T18:33:25+5:30
इजिप्तविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उरुग्वेचा संघ पहिल्यापासून आक्रमक असेल, असे वाटत होते. पण उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझने मात्र साफ निराश केले.
मॉस्को : रशियामध्ये सुरु झालेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या सत्रात उरुग्वेने निराशा केली. इजिप्तविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उरुग्वेचा संघ पहिल्यापासून आक्रमक असेल, असे वाटत होते. पण उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझने मात्र साफ निराश केले.
सामन्याच्या सुरुवातीपासून उरुग्वेने चांगले आक्रमण केले. पण त्यांचे हे आक्रमण इजिप्तच्या बचावपटूंनी उत्तमपद्धतीने रोखले. या सामन्याच्या पहिल्या सत्रात इजिप्तने आक्रमणावर जास्त भर दिला नाही. काही संधी त्यांच्याकडेही चालून आल्या, पण त्यांना संधीचे सोने करता आले नाही.
सुआरेझला सामन्याच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये चांगली संधी चालून आली होती, पण सुआरेझने ही संधी दवडली. त्यानंतर एक सुरेख पास सुआरेझकडे आला होती. त्यावेळी सुआरेझ इजिप्तच्या गोलजाळ्याजवळ होता. सुआरेझपुढे यावेळी फक्त गोलरक्षकाचा अडसर होता. ही सुआरेझसाठी सर्वोत्तम संधी होती. पण यावेळी सुआरेझला चांगली किक मारता आली नाही.