Fifa World Cup 2022 : १९६६च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडची डरकाळी; इराणवर दमदार विजय मिळवत नोंदवले अनेक विक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 08:45 PM2022-11-21T20:45:12+5:302022-11-21T20:51:03+5:30

Fifa World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी एकतर्फा निकाल पाहायला मिळाला.

Fifa World Cup 2022 : 1966 World Cup winner England won by 6-2 against Iran in first match, break many records | Fifa World Cup 2022 : १९६६च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडची डरकाळी; इराणवर दमदार विजय मिळवत नोंदवले अनेक विक्रम 

Fifa World Cup 2022 : १९६६च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडची डरकाळी; इराणवर दमदार विजय मिळवत नोंदवले अनेक विक्रम 

googlenewsNext

Fifa World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी एकतर्फा निकाल पाहायला मिळाला. १९६६ सालच्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडने युवा ब्रिगेडच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर आशियाई चॅम्पियन इराणवर ६-२ असा विजय मिळवला. ज्यूड बेलिंगहॅम, बुकायो साका ( दोन गोल), रहिम स्टर्लिंग,  जॅक ग्रेलिश व मार्कस रॅशफोर्ड या इंग्लंडच्या फ्युचर स्टार्सनी गोल केले. इराणकडून मेहदी तरेमीने दोन गोल केले. दुर्दैवाने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांत आशियाई ( कतार व इराण) संघांना पराभव पत्करावा लागला. 

  • १९ वर्ष व १४५ दिवसांचा ज्यूड बेलिंगहॅम हा वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडकडून खेळणारा तिसरा युवा खेळाडू ठरला. यापूर्वी १९९८च्या वर्ल्ड कपमध्ये मिचेल ओवेन ( १८ वर्ष व १९८ दिवस) आणि २०१४ मध्ये ल्युक शॉ ( १८ वर्ष व ३४७ दिवस) यांनी वर्ल्ड कप खेळला होता. 
  • ज्यूड बेलिंगहॅम हा इंग्लंडकडून वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा दुसरा युवा खेळाडू ठरला. यापूर्वी ओवेनने १९९८मध्ये १९ वर्ष व १९० दिवसांचा असताना गोल केला होता. 
  • बुकायो साका ( २१ वर्ष व ७८ दिवस) हा चौथा युवा खेळाडू ठरला. इंग्लंडने पहिल्या हाफमध्ये ३-० अशी आघाडी कायम राखली.  वर्ल्ड कप इतिहासात एकाच सामन्यात २१ वर्षांखालील दोन खेळाडूंनी गोल करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 
  • वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या हाफमध्ये ३ + गोल करण्याची इंग्लंडची ही चौथी वेळ आहे, यापूर्वी त्यांनी पोलंड ( १९८६), डेन्मार्क ( २००२), पनामा ( २०१८) यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केलीय.
  • इंग्लंडने आज पहिल्या हाफमध्ये ३६६ पास दिले आणि वर्ल्ड कप स्पर्धेत १९६६नंतरही ही पहिल्या हाफमधील दुसरी विक्रमी कामगिरी ठरली. यापूर्वी २०१९मध्ये स्पेन विरुद्ध रशिया यांच्या सामन्यात ३९५ पासेस दिले गेले होते. इराणने आज केवळ ४६ पास दिले आणि ही सर्वात निचांक कामगिरी आहे.  
  • बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्कस रॅशफोर्डने आज ४९ सेकंदात गोल केला आणि वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात इंग्लंडसाठी बदली खेळाडूने केलेला हा तिसरा जलद गोल ठरला.  
  • बुकायो साका ( २१ वर्ष व ७७ दिवस) याने वर्ल्ड कप स्पर्धेच्या त्याच्या पहिल्याच सामन्यात २+ गोल केले. १९६६ साली फ्रान्झ बेकनबोएर ( २० वर्ष व ३०४ दिवस) यांच्यानंतर साका हा दुसरा युवा खेळाडू ठरला.  

वर्ल्ड कप स्पर्धेत आजची लढत खेळण्याआधी झालेल्या सहा सामन्यांत ( ३ पराभव व ३ अनिर्णित) इंग्लंडला एकही विजय मिळवता आलेला नाही आणि ही त्यांची आतापर्यंत निराशाजनक कामगिरी आहे, त्यामुळे थ्रीलायन्सची चिंता वाढली आहे. पण, मागील दोन महत्त्वांच्या ( वर्ल्ड कप २०१८ व युरो ) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो एकमेव युरोपियन संघ आहे. इराणच्या खेळाडूंनी स्वतःचंच राष्ट्रीय गीत गाण्यास दिला नकार... प्रेक्षकांनी राष्ट्रगीत सुरू असताना गोंधळ केला. इराणच्या प्रेक्षकांकडून WomanLifeFreedom चे फलक झळकावले गेले. सामन्याच्या १० व्या मिनिटाला इराणचा गोलरक्षक अलिरेझा बेईरांवंडया आणि बचावपटू यांच्यात टक्कर झाली आणि अलिरेझाच्या नाकातून रक्तस्त्राव झाला.. त्यानंतर बराच काळ वैद्यकीय उपचारासाठी सामना थांबवण्यात आला होता आणि  त्याला माघारी जावे लागले. होसैन होसैनी या गोलरक्षक म्हणून मैदानावर आला.  


३२ व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेला चेंडू हॅरी मॅग्युरेन हेडरद्वारे गोलपोस्टच्या दिशेने अचूक टोलवला, परंतु नशीबाने साथ न दिल्याने तो क्रॉसबार लागून माघारी फिरला. पण, तीन मिनिटांत इंग्लंडने आघाडी मिळवली. यावेळेस संघातील युवा खेळाडू बेलिंगहॅम याने हेडरद्वारे गोल केला. त्यानंतर ४३ व्या मिनिटाला बुकायो साका व ४५+१ मिनिटाला रहिम स्टर्लिंग अफलातून गोल करताना इंग्लंडला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. साकाने व्हॉलीद्वारे केलेला प्रयत्न इराणच्या गोलीला रोखताच आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडकडून आक्रमक खेळ सुरू होता आणि आशियाई चॅम्पियन इराण संधीच्या शोधात दिसले. ६२व्या मिनिटाला साकाने आजच्या लढतीतील दुसरा गोल केला. त्याने पेनल्टी क्षेत्रात इराणच्या बचावपटूंना आपल्या तालावर नाचवत हा गोल केला. 


इराणला ६५व्या मिनिटाला यश आले. इराणच्या खेळाडूंनी सुरेख पासींग खेळ केला आणि मेहदी तरेमीने चेंडू गोलजाळीत पाठवून त्यांच्या मेहनतीला यश मिळवून दिले.  ६७व्या मिनिटाला इंग्लंडचा प्रमुख खेळाडू हॅरीला हॅमस्ट्रींगमुळे मैदानाबाहेर जावे लागले. बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या मार्कस रॅशफोर्ड ( ७१ मि.) आणि जॅक ग्रेलिश ( ९० मि.) यांनी इंग्लंडला ६-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. इथून इराणचे कमबॅक अशक्यच होते आणि तसेच झाले. इंग्लंडने दणदणीत विजयासह वर्ल्ड कपमधील प्रवास सुरू केला. ९०+८ मिनिटाला इराणचा दुसरा गोल पोस्टमुळे अडला गेला. मेहदीने पेनल्टीवर गोल करून पिछाडी २-६ अशी कमी केली. 
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: Fifa World Cup 2022 : 1966 World Cup winner England won by 6-2 against Iran in first match, break many records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.