FIFA World Cup 2022: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये मोठी उलथापालथ, ४ वेळचा विजेता जर्मनी बाहेर, असा झाला गेम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 08:48 AM2022-12-02T08:48:33+5:302022-12-02T08:48:55+5:30
FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. चार वेळचा वर्ल्डकप विजेता असलेला जर्मनीचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
दोहा - कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. चार वेळचा वर्ल्डकप विजेता असलेला जर्मनीचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गुरुवारी रात्री खेळवल्या गेलेल्या गटसाखळीतील सामन्यात जर्मनीने कोस्टा रिकावर ४-२ ने मात केली. मात्र गोलफरकातील तफावतीमुळे जर्मनीचा संघ स्पेनपेक्षा पिछाडीवर पडला. गटसाखळीत जर्मनी आणि स्पेनचे प्रत्येकी ४ एवढे गुण होते. मात्र गोलफरकामुळे स्पेनने सरशी साधली.
साखळीतील ३ सामन्यात मिळून स्पेनने ९ गोल केले. तर त्यांच्याविरुद्ध केवळ ३ गोलच झाले होते. दुसरीकडे जर्मनीने ६ गोल केले. मात्र त्यांच्याविरोधातही ५ गोल झाले. हा गोलफरक अखेर जर्मनीला महागात पडला. ग्रुप ईमधून जपान आणि स्पेनचे संघ उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. तर जर्मनीचा संघ सलग दुसऱ्या वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीतच गारद झाला.
पुढची फेरी गाठण्यासाठी जर्मनीला कोस्टा रिकावर विजय मिळवणे आवश्यक होते. तसेच स्पेन आणि जपान यांच्यातील लढतीवरही त्यांचं भविष्य अवलंबून होतं. जर स्पेनने जपानवर विजय मिळवला असता तर जर्मनीला पुढची फेरी गाठता आली असती. मात्र जपानने धक्कादायक निकाल नोंदवताना स्पेनवर २-१ ने मात केली. तसेच ६ गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवत पुढची फेरी गाठली.
दरम्यान, कोस्टारिकाविरुद्ध जर्मनीने सर्ज ग्नब्रीच्या गोलच्या जोरावर १-० अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरापर्यंत ही आघाडी कायम होती. मात्र मध्यांतरानंतर येल्तसिन तेजेदा याने गोल करून कोस्टारिकाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ७० व्या मिनिटाला जर्मन गोलरक्षक मेनुअल नेउर याच्या आत्मघाती गोलमुळे कोस्टारिकाने २-१ अशी आघाडी घेतली. मात्र काई हेवर्ट्जने ७३ आणि ८५ व्या मिनिटाला गोल करत जर्मनीला ३-२ असे आघाडीवर नेले. त्यानंतर निकालस फुलक्रग याने केलेल्या गोलच्या जोरावर जर्मनीने ४-२ अशा आघाडीसह विजय मिळवला.