FIFA World Cup 2022: पोर्तुगालचा कसाबसा विजय, घानाने दिली कडवी टक्कर, रोनाल्डोचा विक्रमी गोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 06:53 AM2022-11-25T06:53:42+5:302022-11-25T06:54:30+5:30

FIFA World Cup 2022: स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तोयानो रोनाल्डोने गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिल्यानंतर घानाने जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे पोर्तुगालने चांगल्या सुरुवातीनंतरही घानाविरुद्ध ३-२ अशा विजयावर समाधान मानले.

FIFA World Cup 2022: Portugal's big win, Ghana's tough fight, Ronaldo's record goal | FIFA World Cup 2022: पोर्तुगालचा कसाबसा विजय, घानाने दिली कडवी टक्कर, रोनाल्डोचा विक्रमी गोल

FIFA World Cup 2022: पोर्तुगालचा कसाबसा विजय, घानाने दिली कडवी टक्कर, रोनाल्डोचा विक्रमी गोल

Next

दोहा : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तोयानो रोनाल्डोने गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिल्यानंतर घानाने जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे पोर्तुगालने चांगल्या सुरुवातीनंतरही घानाविरुद्ध
३-२ अशा विजयावर समाधान मानले. घानाने अखेरच्या मिनिटापर्यंत जबरदस्त झुंज देत पोर्तुगीज संघाचा घाम काढला. पाच वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो पहिला फुटबॉलपटू ठरला. 
ह गटात झालेल्या या लढतीत सर्वांच्या नजरा रोनाल्डोवर खिळल्या होत्या. त्याने आपल्या चाहत्यांना निराश न करता शानदार खेळ करत संघाला आघाडीवरही नेले. मात्र, नंतर त्याला मैदानाबाहेर बोलावण्यात आल्यानंतर घानाने जवळपास सामना पोर्तुगालच्या हातून खेचलाच होता. याआधी, २०१४ च्या विश्वचषक साखळी सामन्यात घानाने पोर्तुगालला झुंजवले होते. त्यावेळी पोर्तुगालने २-१ अशी बाजी मारली होती. घानाने यावेळीही काहीसा तसाच खेळ केला. सामन्याच्या पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी राहिली.
दुसऱ्या सत्रात ६५व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टी किकवर विश्वविक्रमी गोल करत पोर्तुगालला आघाडीवर नेले. यानंतर घानाचा कर्णधार आंद्रे एयू याने संघाला शानदार बरोबरी साधून दिली. घाना बाजी पलटवणार असे दिसत असताना जोआओ फेलिक्सने ७८व्या मिनिटाला आणि राफेल लियाओने ८०व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगालला ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पोर्तुगाल सहज विजय मिळवणार असे चित्र असताना घानाच्या ओसमान बुकारीने ८९व्या मिनिटाला गोल करत सामन्यात ३-२ असे रंग भरले. निर्धारित वेळेनंतर मिळालेल्या अतिरिक्त वेळेत पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कोस्टाकडून मोठी चूक झाली. त्याने चेंडू सोडलेला असताना, त्याच्या मागे असलेल्या घानाच्या विलियम्सनने चेंडूवर ताबा मिळवला, मात्र पोर्तुगीज मध्यरक्षकाच्या प्रसंगावधानाने हा गोल झाला नाही. अन्यथा पोर्तुगालचा विजय थोडक्यात हुकला असता. 

< सलग पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनल्डो पहिला फुटबॉलपटू ठरला. तर तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये पेनल्टी किकवर गोल करणारा रोनाल्डो पहिला फुटबॉलपटू ठरला.
< विश्वचषकात गोल करणारा ३७ वर्षीय रोनाल्डो हा कॅमरुनचा रॉजर मिलानंतरचा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. रॉजरने १९९४ मध्ये वयाच्या ४२व्या वर्षी गोल केला होता. 
< रोनाल्डोने विश्वचषकात पोर्तुगालकडून गोल करणारा सर्वात युवा खेळाडूसह सर्वात वयस्कर खेळाडूचाही विक्रम आपल्या नावावर केला. 
 

Web Title: FIFA World Cup 2022: Portugal's big win, Ghana's tough fight, Ronaldo's record goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.