FIFA World Cup 2022: मोरक्कोच्या पराभवानंतर हिंसाचार, संतप्त फॅन्सचा फ्रान्सपासून ब्रुसेल्सपर्यंत धुमाकूळ, हाणामारी, जाळपोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 09:37 AM2022-12-15T09:37:19+5:302022-12-15T09:37:51+5:30
FIFA World Cup 2022: फ्रान्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी फ्रान्सच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या फ्रेंच फॅन्सवर हल्ला केला. तर ब्रुसेल्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला आणि जाळपोळ केली
पॅरिस - कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये रात्री झालेल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने मोरक्कोचा २-० ने पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या मोरक्कोचा पराभव झाल्याने संतप्त झालेल्या मोरक्कोच्या फॅन्सनी प्रचंड हिंसाचार केला. फ्रान्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी फ्रान्सच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या फ्रेंच फॅन्सवर हल्ला केला. तर ब्रुसेल्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला आणि जाळपोळ केली. यावेळी पोलिसांसोबतही त्यांच्या चकमकी घडल्या.
वर्ल्डकमध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या मोरक्कोचा पराभव फॅन्सना सहन झाला नाही. या पराभवानंतर मोरक्कोचे फॅन्स ब्रुसेल्सच्या दक्षिण स्टेशनजवळ गोळा झाले. त्यानंतर मोरक्कोच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली. तसेच मोरक्कोचे हे समर्थक आणि पोलिसांमध्येही चकमकी घडल्या. या हिंसक जमावाने पोलिसांवर फटाके टाकले. त्यानंतर पोलिसांनाही वॉटर कॅननचा वापर करावा लागला. पोलिसांनी मोरक्कोच्या काही फॅन्सनाही अटक केली.
फ्रान्समधील पॅरिसमध्येही मोरक्कोच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला. फ्रान्समध्ये विजयानंतर फॅन्स रस्त्यावर उतरले होते. मात्र अनेक ठिकाणी मोरक्को आणि फ्रान्सच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. फ्रान्स हा मोरक्कोचा संरक्षक देश मानला जातो. त्यामुळे फ्रान्समध्ये मोरक्कोमधील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.
फ्रान्समध्ये फ्रेंच आणि मोरक्कोचे फॅन्स आमनेसामने आले. अनेक ठिकाणी हिंसक हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी वॉटर कॅनन आणि टियर गॅसचा वापर करावा लागला. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.